BMC :…तोपर्यंत स्वच्छ मुंबईचे स्वप्न साकार होणार नाही!

231
  • सचिन धानजी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील आठवड्यात माझगाव, अंधेरी, सांताक्रुझ भागात फिरत असताना त्यांना ठिकठिकाणी अस्वच्छता, डेब्रीज आणि रस्तोरस्ती गल्लीबोळांमध्ये बॅनर, फलक दिसले. त्यानंतर तात्काळ त्यांनी बैठक घेऊन महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बालसिंह चहल यांना मुंबईत स्वच्छता राखली जावी आणि मुंबईला विद्रूप करणारे बॅनर व फलक काढण्याच्या सूचना केल्या.

मुख्यमंत्री महोदयांच्या या सूचनांचे निश्चितच स्वागत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना ज्या माझगावमध्ये अस्वच्छता दिसली, त्याला जबाबदार धरून मुंबई महापालिका (BMC) ई विभागाचे सहायक आयुक्त अजयकुमार यादव यांची बदली केली. वरवर पाहता ही बदली धाडसी निर्णय असला तरी यादव यांना बळीचा बकरा बनवला गेले हे जाणण्या इतपत जनता मुर्ख नाही. मुळात ज्या जागेत अस्वच्छता दिसली ती जागा मुंबई पोर्ट ट्रस्टची. ते एक स्वतंत्र प्राधिकरण असून त्या भागातील स्वच्छता राखणे हे त्यांचे काम आहे. जर पोर्ट ट्रस्टच्या जागेत कचरा, डेब्रीज दिसून आले तरी त्यांच्या अध्यक्षांवर कारवाई करायला हवी होती. पण मुख्यमंत्र्यांचे समाधान व्हावे म्हणून आयुक्तांनी ही बदली केली असेल तर कर्मचाऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची. मुळात आज संपूर्ण मुंबईत जी अस्वच्छता दिसून येत आहे, त्याला महापालिका आयुक्तांना जबाबदार धरून जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली असती तर ते खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या नजरेत हिरो ठरले असते. पण शेवटी छोट्या माशाचाच बळी घेतला जातो.

प्रशासक असल्याने राज्य सरकारच्या अखत्यारित महापालिकेचा कारभार चालत असला तरी अशाप्रकारे जबाबदारी नसलेल्या कामांसाठी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून जर कारवाई होणार असेल तर ते बरोबर नाही. आज कुणीही उठावे आणि टपली मारून जावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण ती वेळ सुद्धा दूर नाही जर या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम बंद केले तर आपले जगणेही मुश्किल होऊन जाईल. आज जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची सर्व सेवा महापालिका (BMC) देत आहे. कोविड काळात हे कर्मचारी रस्त्यावर होते म्हणून आपण त्यावेळी घरात सुरक्षित बसलो होतो. कोविड काळात अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी मृत पावले, त्यावेळी कोविडची बाधा झालेल्यांना वाचवण्यासाठी महापालिकेचाच अधिकारी व कर्मचारी पुढे होता हेही सरकारने विसरू नये.

ज्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील अस्वच्छतेमुळे मुख्यमंत्री महोदयांचे मन हेलावून गेले, ते बीपीटी आता स्वतंत्र प्राधिकरण आहे. जर त्यांच्या जागेतील विकासातून मिळणारा महसूल ते स्वत:च्या तिजोरीत जमा करणार असतील आणि त्या भागातील स्वच्छतेची अपेक्षा महापालिकेकडून केली जाणार असेल तर ते बरोबर नाही. मुख्यमंत्री महोदयांनी, या प्राधिकरणाला तात्काळ निर्देश देत या भागातील स्वच्छतेसाठी महापालिकेला निधी देण्यास भाग पाडावे आणि खुशाल त्या भागात स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा.

(हेही वाचा Devendra Fadanvis : कोणाच्या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्ट करू शकेल – देवेंद्र फडणवीसांनी उदनिधी, स्टालिन यांना सुनावले )

महापालिकेचे (BMC) तत्कालीन आयुक्त सुबोधकुमार यांनी मुंबईच्या विकासासाठी इमारतींच्या बांधकामांतून मिळणाऱ्या फंजिबल एफएसआयमधून मिळणाऱ्या महसुलाची निर्मिती केली. ज्यातून मुंबईतील कोस्टल रोडसह इतर प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्या फंजिबल एफएसआयमध्येही सरकारने डल्ला मारत त्यातील निधीची वाटणी एमएमआरडीए, महापालिका, धारावी विकास प्राधिकरण आणि एमएसआरडीसी यांच्यामध्ये २५ टक्क्यांप्रमाणे समसमान करून टाकली. आज मुंबईत जरी कोस्टल रोड प्रकल्प आपण करत असलो तरी दहिसर ते भाईंदर या मार्गाची जबाबदारी महापालिकेवर का? ही जबाबदारी सरकार किंवा संबंधित महापालिकेने का घेऊ नये? दुसरीकडे पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व मुक्त मार्ग हे पालिकेकडे हस्तांतरीत झाले आहेत. म्हणजे त्या रस्त्यांची जबाबदारी पालिकेकडे. मग या रस्त्यांवर होणाऱ्या खर्चाचा निधी एमएमआरडीए, एमएसआरडीसीकडून महापालिकेला देण्यासाठी मुख्यमंत्री महोदय पुढाकार घेणार का? असो बरेच मुद्दे आहेत. पण ज्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरून अनधिकृत बॅनर व फलक काढण्याचे निर्देश महापालिकेला देताना सरकारमधील पक्षांनी, जर आपल्या कार्यकर्त्यांना असे फलक लावूच नये अशाप्रकारचे आवाहन केले असते तर बरे झाले असते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे बॅनर फलक काढल्यानंतर पुन्हा ते लावले जातात. हे लावणारे हात याच सरकारमधील पक्षांच्या कार्यकर्त्यांचे असतात. त्यामुळे सुशोभीकरणानंतरही मुंबईला बकाल करणारे सरकारमधील पक्षच जबाबदार असल्याचे जर कोणी बोलत असेल तर ते चुकीचे नाही. पण मुंबईतील स्वच्छता जर राखायची असेल तर आधी फेरीवाल्यांना शिस्त लावायला हवी. आज या अस्वच्छतेला वाढते लोंढे आणि वाढते फेरीवाले हेच जबाबदार आहेत. कधीतरी मुख्यमंत्री महोदयांनी दादरला रात्री ९ नंतर फेरफटका मारावा मग किती कचरा निर्माण होताे हे लक्षात येईल.

मोकळी जागा दिसली की थाटा तिथे धंदा, करा तिथे अतिक्रमण आणि मग बांधा तिथे खुशाल बांधकाम हेच पूर्वापार चालत आलेले आहे. हे रोखण्याची हिंमत या राज्याचा कारभार चालवणाऱ्या एकनाथांच्या हाती आहे का? ज्या दिवशी मुंबईत होणारे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम तसेच वाढते फेरीवाले यांची संख्या नियंत्रणात येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे स्वप्न साकार होईल, असे आम्हाला वाटते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.