मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आता सुमारे साडेपाच हजार आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात येणार असून या आशा स्वयंसेविकांना कामांच्या आधारीत प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या २४ विभागाच्या माध्यमातून लवकरच जाहिरात प्रकाशित करून कंत्राटी पध्दतीवर आशा स्वयंसेविकांची नियुकती केली जाणार आहे.या आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी जावून वैद्यकीय आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आजारांची जनजागृती घेऊन प्राथमिक स्तरावरच यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबईत सुमारे १.३ कोटी लोकसंख्या असून याकरता एकूण दहा हजार आशा स्वयंसेविका यांची आवश्यकता आहे. शहरी भागात एक हजार लोकसंख्येमार्ग एक आशा स्वयंसेविकांची निवड करण्यात येणार आहे. महानगरपालिका वस्तीपातळीवर गृहभेटींद्वारे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवित आहे. या आरोग्य सेवा स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय व निम्न वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत पुरविण्यात येत आहे. या अधिकारी कर्मचारी यांच्या अधिपत्यात आशा सेविका कार्यरत आहेत. आशा सेविका गृहभेटीद्वारे गरोदर माता, लहान बालके यांना समुपदेशन व उपचार घेण्यास प्रवृत्त करतात.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान उपक्रमाद्वारे मुंबई जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण संस्था यांना निधी प्राप्त होत असतो. सदर निधीमधून नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांना कामावर आधारीत मोबदला स्वरुपात अधिदान करण्यात येते. या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आशा सेविकांची एकूण ७२५ पदे मंजूर असून, अद्यापपर्यंत त्यापैकी ६७० आशा सेविकांची नेमणूक करण्यात आली आहे व तसेच उर्वरीत ५५ पदांच्या नेमणूकींची प्रक्रिया सुरू आहे. तर महापालिकेच्या मार्फत मंजूर महिला आरोग्य सेविकांची पदे ही ३७०० एवढी आहे. त्यामुळे एकूण आशा स्वयंसेविकांची आवश्यकता ही ५५७५ पदांची आहे.
(हेही वाचा धनुष्यबाण आमच्या पूजेतला, तो ओरबाडून घेता येणार नाही – उद्धव ठाकरे)
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबईमध्ये ५५७५ अतिरिक्त आशा स्वयंसेविका नेमणूक करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ५५७५ आशा स्वयंसेविकांची नेमणूक करून कामावर आधारीत मोबादला देण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविकांच्या समावेशामुळे मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये उच्च जोखीमीच्या गरोदर माता यांचा पाठपुरावा करून माता मृत्यू दर कमी करणे, राष्ट्रीय जंत नाशक कार्यक्रम, रक्तक्षय मुक्त भारत, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, मधुमेह व रक्त दाब शोधणे, आरोग्य वर्धींनी केंद्र, बालकांचे लसीकरण, राष्ट्रीय आरोग्य अभियान आदींच्या माध्यमातून कामांच्या आधारीत मानधन दिले जाणार आहे.
त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रशासकांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून याला मान्यता मिळाल्यानंतर २४ विभागांच्या माध्यमातून स्वतंत्र जाहिरात काढून आशा स्वयंसेविकांची निवड केली जाईल. स्थानिक पातळीवर दहावी व बारावी उत्तीर्ण महिलांची या आशा स्वयंसेविका म्हणून निवड केली जाईल आणि यासर्वांना कामांच्या आधारीत प्रोत्साहन भत्ता दिला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community