मुंबईत मलेरिया आणि स्वाईन फ्लूचा विळखा वाढत आहे. आरोग्य विभागाच्या पाहणीत जून ते जुलै महिन्यात सहा जणांचा लॅप्टो, मलेरिया, डेंग्यू आणि स्वाईन फ्लुमुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यापैकी डेंग्यू आणि स्वाईनफ्लुमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण मुंबई, सांताक्रूझ, अंधेरी, कांदिवली येथे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली गेली.
डेंग्यूचा पहिला बळी
ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे ५०९ रुग्ण तर स्वाईनफ्लूचे १६३ रुग्ण आढळले आहेत. जुलै महिन्याच्या मध्यापासून मुंबईत लॅप्टो आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वेगाने वाढ होऊ लागली होती. जुलै महिन्यातच सहाबळींपैकी पाच बळींची नोंद झाली. मात्र डेंग्यूचा पहिला बळी जून महिन्यात झाल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीतून दिसून आले. आठ वर्षांची मुलगी मुंबईतील डेंग्यूची पहिली बळी ठरली. ताप, पोटदुखी आणि उलटीने १९ जून रोजी खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. त्यावेळी तिला डेंग्यूचे निदान झाले. २२ जून रोजी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
लॅप्टोचा पहिला बळी
जुलै महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यांत तीन मृत्यूची नोंद झाली. ४ जुलै रोजी ३४ वर्षीय पुरुष लॅप्टोचा पहिला बळी ठरला. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यात त्याने प्रवास केला होता. ताप, अंगदुखीच्या त्रासाने ४ जुलै रोजी रुग्णाने रक्ततपासणी केली. त्यावेळी रुग्णाला लॅप्टोचे निदान झाले. मात्र शरीरातील अवयव निकामी पडल्याने त्याच दिवशी रुग्णाचा मृत्यू झाला.
मलेरियाचा पहिला बळी
५५ वर्षीय पुरुषाला उलटी, जुलाब आणि ताप येत होता. तब्येत खालावल्याने २३ जुलैला रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णाला मलेरिया, सेप्सिसमुळे श्वसनाला त्रास तसेच अवयव निकामी पडल्याचे तपासणीत आढळले.
जुलै महिन्यात डेंग्यूमुळे दुस-या रुग्णाचा मृत्यू
३८ वर्षीय पुरुषाला ६ जुलैपासून ताप, डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागला. रुग्णाला सेप्सिसचाही त्रास जाणवू लागला. रुग्णाला सहव्याधीही होत्या. अखेर चार दिवसानंतर रुग्णाच्या किडनीत डेंग्यूमुळे जखम झाल्याने मृत्यू झाला.
मृत्यूनंतर दोन्ही रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजले.
स्वाईन फ्लूमुळे मृत्यू
जुलै महिन्यात दोन स्वाईन फ्लूचे मृत्यू झाले. दोन्ही रुग्णांच्या मृत्यूमागील कारणांत रुग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे समजले. इंग्लंड आणि काश्मीरचा प्रवास करुन आलेल्या ४२ वर्षीय पुरुषाने ९ जुलै रोजी मुंबई गाठली. हा दक्षिण मुंबईत राहणारा रहिवासी होता. मुंबईत आल्यापासून रुग्णाची तब्येत ढासळली. दोन दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाचा मृत्यू झाला असता, रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. रुग्ण स्वाईन फ्लूसह, सेप्सिस इन्फेक्शन तसेच शरीरातील अवयव निकामी पडल्याने मृत्यू पावला. स्वाईन फ्लूचा दुसरा बळी ठरलेल्या ४४ वर्षीय पुरुषाला उच्च रक्तदाब आणि स्थूलतेचा त्रास होता. १९ जुलैपासून रुग्णाला श्वसनाचा आणि कफ झाल्याचा त्रास जाणवू लागला. रुग्णालयात आठवडाभर उपचार घेऊनही २६ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला.
( हेही वाचा: मुंबई महापालिका सर्वात मोठा घोटाळा – अमित साटम यांचा हल्लाबोल )
ऑगस्ट महिन्यातील आजारी मुंबईकरांची संख्या –
आजार – रुग्णांची संख्या
- मलेरिया – ५०९
- लॅप्टो – ४६
- डेंग्यू – १०५
- गॅस्ट्रो – ३२४
- हेपेटायटीस – ३५
- चिकनगुनिया – २
- स्वाईन फ्लू – १६३