Tata Power : विजेच्या बाबतीत देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा ग्रीडमधील बिघाडामुळे विजेची टंचाई निर्माण झाल्यास अशा परिस्थितीत मुंबईतील (Mumbai) रुग्णालये, मेट्रो, विमानतळ, डेटा सेंटर अशा महत्त्वाच्या सेवांचा वीजपुरवठा अखंडितपणे (Power outage) सुरू राहणार आहे. त्यासाठी टाटा पॉवर (Tata Power) मुंबईत तब्बल १०० मेगावॉट क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम उभारणार आहे. त्यामुळे मुंबईत ब्लॅक आऊट (Black out) झाले तरी महत्त्वाच्या सेवांचा बीजपुरवठा सुरळीत राहू शकेल. (Tata Power)
मुंबईत सुमारे आठ लाख निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना (Business customers) वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरला १०० मेगावॅट क्षमतेची ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम’ उभारण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मंजुरी दिली आहे. अत्याधुनिक ‘ब्लॅक स्टार्ट’ पर्यायाने सुसज्ज असलेली ही प्रणाली, ग्रिडमध्ये अडथळा निर्माण झाल्यास मेट्रो, रुग्णालये, विमानतळ आणि डेटा सेंटर्ससह महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना वीजपुरवठा जलद गतीने पुनर्संचयित करेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे ‘ब्लॅक आऊट’ टाळता येतील आणि मुंबईच्या वीज वितरण प्रणालीची लवचिकता वाढेल.
बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रणालीत विजेचा दर कमी असताना ही वीज साठवून, उच्च दराच्या काळात तिचा वापर केला जाईल. त्यामुळे वीज खरेदीचा खर्च कमी करण्यास मदत होईल, ज्यामुळे भविष्यात ग्राहकांसाठी विजेच्या दरात आणखी कपात करणे शक्य होईल. तसेच या वीजसाठ्यामुळे कमी-अधिक मागणीच्या काळात विजेचे व्यवस्थापन करता येईल. यामध्ये संपूर्ण १०० मेगावॉटची ही प्रणाली १० मोक्याच्या ठिकाणी, विशेषतः मुंबई वितरणातील लोड सेंटर्सजवळ स्थापित केली जातील, ज्याचे केंद्रीय निरीक्षण आणि नियंत्रण टाटा पॉवरच्या पॉवर सिस्टीम कंट्रोल सेंटरकडून (पीएससीसी) केले जाईल.