दिवाळीत फटाके फोडताना मुंबईकरांनो घ्या अशी काळजी

172

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ क्रमांक १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

( हेही वाचा : बदलापूरमध्ये कोंडेश्वर मंदिराजवळील धबधब्यात ४ मुलं बुडाली )

दरवर्षी अतिशय उत्साहात आपण सारेजण दीपावली सण साजरा करतो. या मंगलमय प्रसंगी दीपोत्सव साजरा करीत असतांना फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोशणाई केली जाते. बऱ्याचदा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घेतल्यास दीपावली सणाचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.

फटाके फोडताना कशी घ्याल काळजी

  • फटाके फोडतांना सुती कपडे परिधान करावेत.
  • फटाके मुलांपासून लांब ठेवावेत व फोडतांना मोठ्या व्यक्तिंनी सोबत रहावे.
  • फटाके फोडतांना नेहमी पादत्राणे वापरावीत.
  • फटाके लावतांना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व भाजल्यास तात्काळ भाजलेल्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.
  • फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजाचा वापर करावा.

फटाके फोडताना कोणत्यात बाबी टाळाव्यात

  • इमारतीच्या आत व जिन्यावर फटाके फोडू नयेत.
  • फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा थेट वापर करु नये.
  • झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.
  • खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.
  • विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा पार्किंगच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
  • इमारतीला रोशणाई करतांना विद्युत तारांची जोडणी ओव्हरलोड करू नये, सैल जोडणी टाळावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.