BMC : नालेसफाईच्या कामांमध्ये कुचराई झाल्यास यंदा मुंबईकर जाणार पुरात वाहून

या सर्व नाल्यांमधून १३ लाख १० हजार १५१ मेट्रीक टन एवढा गाळ काढणे अपेक्षित असून त्यातील ८० टक्के म्हणजे १० लाख २२ हजार १३१ मेट्रीक टन एवढा गाळ हा ३१ मे २०२४ पर्यंत काढला जाणार आहे.

1052

मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असली तरी यंदा नालेसफाईच्या कामांमध्ये थोडीफार जरी कुचराई झाल्यास मुंबईकरांना पुरात वाहून जाण्याची वेळ येणार आहे. येत्या जुलै ते सप्टेंबर या कालावधी मुसळधार पावसाची शक्यता असून महापालिकेचे (BMC) आयुक्त आणि दोन्ही अतिरिक्त आयुक्त हे नवखे आहे. मात्र, या सर्वांकडून अद्यापही कार्यालयात बसूनच विभाग आणि खात्यांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे मुंबईतील नाल्यांसह रस्त्यांसह प्रकल्प कामांची माहिती प्रत्यक्ष स्थळी जावून केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुमारे २५० कोटी रुपये खर्च

मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदाराची निवड करून फेब्रुवारी त्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमधील  छोटया, मोठ्या नाल्यांसह द्रुतगती महामार्गालगतच्या नाल्यांच्या सफाईसाठी ३१ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या नालेसफाईच्या कामांसाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

या सर्व नाल्यांमधून १३ लाख १० हजार १५१ मेट्रीक टन एवढा गाळ काढणे अपेक्षित असून त्यातील ८० टक्के म्हणजे १० लाख २२ हजार १३१ मेट्रीक टन एवढा गाळ हा ३१ मे २०२४ पर्यंत काढला जाणार आहे. यातील आतापर्यंत एकूण २ लाख ४४३ मेट्रीक टन एवढा गाळ काढण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने देण्यात आल  आहे. यामध्ये शहर भागात साडे आठ टक्के, पूर्व उपनगरांत १७ टक्के आणि पश्चिम उपनगरांत १६ टक्के एवढा गाळा काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम हे ५१ टक्के एवढे झाले आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात दाखल खटल्याच्या तपासात दिरंगाई; सात्यकी सावरकरांचा गंभीर आरोप )

२६ जुलै सदृश्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्य

मुंबई महापालिकेत भुषण गगराणी यांची आयुक्त तथा प्रशासक म्हणून २० मार्च रोजी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी २१ मार्च रोजी पदाचा भार स्वीकारला. तर त्याबरोबरच अतिरिक्त आयुक्त म्हणून  डॉ. अमित सैनी आणि अभिजित बांगर यांनीही २१ मार्च रोजी पदाचा भार स्वीकारला. त्यामुळे आयुक्तांसह दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी पदभार स्वीकारुन १५ दिवसांचा अवधी लोटला असून अद्यापही तिन्ही अधिकारी  आपल्या दालनातच बसून आढावा घेत आहेत.

विशेष म्हणजे हवामान खात्याच्या अनुमानानुसार येत्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा नालेसफाई  योग्यप्रकारे न झाल्यास पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील दोन वर्षांमध्ये पाऊस हा थांबून थांबून लागल्याने त्याचा परिणाम जाणवला नाही. परंतु यंदाच्या पावसाळ्यात ही शक्यता कमी असून जर सलग मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईत २६ जुलै सदृश्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता  काही अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सर्वांत महत्वाचे म्हणजे आयुक्तांसह  प्रकल्प आणि पूर्व उपनगराची जबाबदारी असणारे दोन्ही अतिरिक्त आयुक्त हे नवीन असल्याने त्यांना मुंबईची भौगोलिक परिस्थिती जाणून घेणे खुपच आवश्यक आहे. त्यामुळे सध्या कार्यालयात बसून विभागांचा आढावा घेण्याऐवजी त्यांनी रस्त्यावर उतरुन पाहणी करून प्रत्येक विभागांकडून आढावा घेणे आवश्यक आहे. यामुळे आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांना प्रत्यक्ष  स्थळी काय चालले याची माहिती होईल,असेही बोलले जात आहे. त्यामुळे आज या सर्व अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन काम करण्याची गरज असताना प्रत्यक्षात ते कार्यालयातच बसून आढावा घेत असल्याने ऐन पावसाळ्यात नाल्यांसह रस्त्यांवरील समस्या जाणून घेताना त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल अशीही भीती वर्तवली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.