पहाटेचा गारवा मुंबईमध्ये ( Weather update) सध्या जाणव नाही. अजूनही कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वर असल्याने दिवसा जाणवणाऱ्या थंडीसाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता असली तरीही मुंबईमध्ये किमान तापमान २०.०५ अंशापर्यंत खाली उतरले असल्याने थंडीचा ऋतू सुरू झाल्याची जाणीव झाली. त्यामुळे मुंबईकरांना पुढचे ६ दिवस किंचित गारठा जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सांताक्रूझ येथे मंगळवारी २०.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान सोमवारपेक्षा १.१ अंशांनी कमी होते. मात्र अजूनही किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.९ अंशांनी अधिक आहे. कुलाबा येथे किमान तापमान २३ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये मात्र उपनगरांप्रमाणे फारसा गारवा जाणवला नाही. हे तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा २ अंशांनी अधिक आहे. पहाटेची सुखद जाणीव मुंबईमध्ये सध्या दिवसा टिकलेली दिसत नाही. कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा अजूनही चढा आहे. कुलाबा येथे मंगळवारी ३१.५, तर सांताक्रूझ येथे ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.
(हेही वाचा – Weather update: मुंबईकरांना पुढचे ६ दिवस किंचित गारठा जाणवणार, वाचा…हवामानाचा अंदाज )
मुंबईत गारठ्याची शक्यता
प्रादेशिक हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवस मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानामुळे थंडीचा गारठा जाणवण्याची शक्यता आहे. कोकण विभागात केवळ डहाणू येथे मंगळवारी ३० अंशांहून कमी, २८.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात कमाल तापमानात किंचित घसरण नोंदली जात आहे.
डिसेंबरच्या शेवटी थंडीची जाणीव
महाबळेश्वर येथे कमाल तापमानाचा पारा २५.३ अंश सेल्सिअस नोंदला गेला. विदर्भात यवतमाळ आणि ब्रह्मपुरी येथे, मध्य महाराष्ट्रात जेऊर, पुणे, सोलापूर येथे मंगळवारी ३१ अंशांहून अधिक कमाल तापमान नोंदले गेले. राज्यात किमान तापमानाचा पारा खाली उतरत असला तरी हे तापमान अजूनही सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात थंडीची जाणीव वाढू शकेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community