पाकिस्तान, इराणहून आलेल्या वाळूच्या कणांमुळे मुंबईत धूलिकणांचे आच्छादन पसरले. मुंबईतील हवेची गुणवत्ता थेट ३३३ वर नोंदवली गेली असताना मुंबईतील हवेची गुणवत्ता मालाडमध्ये ४३६ पर्यंत पोहोचली. हवा खराब झाल्याने पुढील दोन दिवस एन९५ मास्क वापरा, असे आवाहन ‘सफर’ या मुंबई वेधशाळा आणि आयआयटीएम या केंद्रीय पृथ्वी विज्ञान संस्थेच्या दोन्ही संस्थांनी मिळून तयार केलेल्या संकेतस्थळावर दिली गेली. पुढील दोन दिवस गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, तसेच आवश्यक काळजी घ्या, असेही आवाहन सफरच्यावतीने करण्यात आले.
मालाडची हवा देशभरात धोकादायक
मुंबईतील सर्वच भागांत रविवारी हवेची गुणवत्ता खराबच दिसून आली. बोरिवली वगळता मुंबईतील सर्वच भागांत हवेची गुणवत्ता खराब दिसून आली. मालाडमध्ये तर देशभरातील सर्वच भागांच्या तुलनेत हवेची गुणवत्ता खराब दिसून आली. मालाडमधील ४३६ हे सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण अतिखराब असल्याचे सफरच्यावतीने जाहीर करण्यात आले. त्याखालोखाल माझगावला ३७२, चेंबूर ३४७, अंधेरीत ३४०, भांडूपमध्ये ३३६, वरळीत ३१९, तर वांद्रे-कुर्ला संकुलात ३०७ एवढी सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण पोहोचले. उद्याही मुंबईत हवेची गुणवत्ता अतिखराबच राहील, असा इशारा सफरच्यावतीने देण्यात आला आहे. राज्यात मुंबई वगळता नाशकात हवेची गुणवत्ताही खराब होती, अशी माहिती हवामान अभ्यासकांच्यावतीने दिली गेली. मात्र पुण्यात वाळूचे कण न पोहोचल्याने पुण्यातील हवेची गुणवत्ता समाधानकारक नोंदवली गेली.
(हेही वाचा बापरे…सौराष्ट्रातील वाळवंटातील वाळू मुंबई आणि नाशकात…)
सफरच्या चार केंद्रातील हवेच्या गुणवत्तेची नोंद
- मुंबई – ३३३ – अतिखराब
- अहमदाबाद – २६९ – खराब
- दिल्ली – १४५ – खराब
- पुणे – ८० समाधानकारक