मुंबईत कोरोना काळातील दोन वर्षांत मुंबईतील जन्मदरात प्रचंड संख्येने घट झाली होती. ही घट आता वाढत असल्याचे दिसून येत आहे. २०२०-२१ या कोरोनाच्या दोन वर्षांत मुंबईतील परप्रांतीयांचा समूह आपापल्या राज्यात परतल्याने या काळात मुंबईतील जन्मदर घसरल्याचे निरीक्षण पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी नोंदवले. या आकडेवारीत २०२२ साली वाढ झाली आहे. रोजंदारीसाठी मुंबईत काम करणारा परराज्यातील समूह आता परत येत असल्याने मुंबईतील जन्मदरात आता पूर्वीप्रमाणेच वाढ होईल, असा दावा आरोग्यतज्ज्ञांनी केला.
मुंबईत दरदिवसाला सरासरी ३३० नवजात बालके जन्माला येतात. मुंबईतील नवजात बालकांची संख्या ही प्रामुख्याने स्थलांतरित समूहातील असते. २०१८ वर्षांतील आकडेवारी पाहता मुंबईत १ लाख ५१ हजार ३१० बालके जन्माला आली होती. नवजात बालके बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड राज्यातून मुंबईत रोजंदारीनिमित्ताने येणा-या जोडप्यांची असतात, असे पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. कोरोनाकाळात हा समूह आपापल्या गावी परतला. परिणामी मुंबईतील जन्मदर घटला. २०२० साली मुंबईत केवळ १ लाख २० हजार १८८ नवजात बालके जन्माला आली. २०२१ साली केवळ १ लाख १३ हजार ६६९ बालके मुंबईत जन्माला आली. दोन वर्ष मुंबईत जन्मदर कमी नोंदवला जात असताना २०२२ साली नवजात बालकांची संख्या थेट १ लाख ३३ हजार ६७३ वर पोहोचली. गेल्या पाच वर्षांतील मुंबईतील जन्मदर पाहता केवळ कोरोनातील दोन वर्षांतच मुंबईतील नवजात बालके कमी जन्माला आली. २०२३ वर्षाच्या अखेरिस मुंबईत अंदाजे दीड लाख बालके जन्माला येतील, असाही अंदाज पालिका अधिका-यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा भारतीय कुस्तीतही #MeToo; ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटू उतरल्या ‘मैदानात’)
गेल्या पाच वर्षांतील बालकांची आकडेवारी
वर्ष जन्मदर मुले मुली एकूण
- २०१८ – ७८ हजार २६५ – ७३ हजार ०४५ – १ लाख ५१ हजार ३१०
- २०१९ – ७७ हजार ००५ – ७१ हजार ८९३ – १ लाख ४८ हजार ८९८
- २०२० – ६२ हजार १७४ – ५८ हजार ०१४ – १ लाख २० हजार १८८
- २०२१ – ५८ हजार ९३० – ५४ हजार ७३९ – १ लाख १३ हजार ६६९
- २०२२ – ६९ हजार २०६ – ६४ हजार ४६७ – १ लाख ३३ हजार ६७३