पावसाच्या अभावाने मुंबईसह कोकणात पावसाचा हलका शिडकाव सुरू आहे. मुंबईतल्या पावसाच्या गैरहजेरीने राज्यभरात कमाल तापमानाची नोंद सलग दोन दिवसांपासून सांताक्रूझ वेधशाळेत नोंदवली गेली आहे. रविवारी मुंबईत कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारचे मुंबईतील कमाल तापमान राज्यभरातील सर्वात जास्त कमाल तापमान होते.
मराठवाडा, विदर्भात गारवा
राज्यात कुठेही गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सरासरीपेक्षाही जास्त कमाल तापमान दिसून येत नाही. विदर्भात सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशाने कमाल तापमान खाली उतरले. त्याखालोखाल मराठवाड्यातही कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशाने खाली आले आहे. दोन्ही भागांतील कमाल तापमान २४ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात असल्याने सायंकाळीही गारव्याचा अनुभव येत आहे.
(हेही वाचाः लॉकडाऊनमध्ये केलेल्या शिकारीची दोन वर्षांनी होतेय विक्री)
महाबळेश्वर गारठले
मध्य महाराष्ट्रात केवळ महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. घाट परिसरात चांगलाच गारठा निर्माण झाल्याचा अनुभव महाबळेश्वरला भेट देणा-या पर्यटकांना येत आहे. कमाल आणि किमान तापमानात केवळ एका अंशाचाच फरक असल्याने महाबळेश्वरमध्ये सध्या हुडहुडी भरवणारी थंडी आणि पाऊस असा एकत्र अनुभव येत आहे. रविवारी महाबळेश्वर येथे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस होते. रविवारचे राज्यभरातील सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वरला होते. तर कमाल तापमान १८.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. सायंकाळी साडेपाचपर्यंत महाबळेश्वरला २७ मिमी पाऊस झाल्याचे वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले.
कोकणात तापमान जास्त
राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात कमाल तापमानात फारशी घट नोंदवली गेलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून कोकणपट्ट्यात कमाल तापमान २८ अंशाच्यापुढेच दिसून येत आहे. रविवारी मुंबईत सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअस दिसून आले. तर त्याखालोखाल पावसाचा शिडकावा सुरू झाल्याने सोलापूरातील कमाल तापमान दुस-या स्थानावर सरकले. सोलापूरात कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.