हिंदू देवतांची विटंबना करणारे हास्यकलाकार वीर दास, मुनव्वर फारूकीचे कार्यक्रम रद्द!

151

नुकतेच मुंबईत हिंदू देवतांची विटंबना करणारे हास्यकलाकार वीर दास आणि मुनव्वर फारूकी यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमांना हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी संघटितपणे विरोध केला. परिणामी वीर दास आणि मुनव्वर फारूकी यांना मुंबईतून गाशा गुंडाळावा लागला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करत पोलीस प्रशासन आणि आयोजक यांनी हे कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीला दिली, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे.

यापुढे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान सहन करणार नाही

घनवट पुढे म्हणाले की, ‘कॉमेडी’च्या नावाखाली सातत्याने हिंदु देवता आणि श्रद्धास्थाने यांची निंदानालस्ती करणे, याला आजकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कला स्वातंत्र्य म्हटले जाते. याच अभिव्यक्ती आणि कला स्वातंत्र्याच्या बुरखा पांघरून खरेतर यांना हिंदुद्वेष पसरवायचा असतो, हेच दिसून येते. निखळ विनोद करून समाजाला हसवणे, हे कमी होऊन हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा, हिंदु संस्कृती, धार्मिक कृती, धर्मग्रंथ, देवता आदींचा ‘कॉमेडी’साठी वापर होत आहे. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी कुणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास त्यांवर त्वरित कारवाई होते, ‘सर तन से जुदा’च्या धमक्या दिल्या जातात; मात्र हिंदूंच्या श्रद्धास्थानांची कुणीही टिंगळटवाळी करतो. हिंदूंनी हे किती दिवस सहन करावे? यापुढे हिंदु समाज श्रद्धास्थानांचा अवमान सहन करणार नाही.

दोन्ही कार्यक्रम रद्द 

24 नोव्हेंबर या दिवशी शीव येथील षण्मुखानंद सभागृहात वीर दासचा कार्यक्रम, तर 27 नोब्हेंबर या दिवशी वांद्रे येथील ‘आर.डी. नॅशनल कॉलेज’ येथे मुनव्वर फारूकीचा कार्यक्रम होणार होता. या दोन्ही कार्यक्रमांना हिंदुत्वनिष्ठांनी कायदेशीर मार्गाने विरोध केला. हिंदु जनजागृती समिती, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, मानव सेवा संघ आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी वीर दास याच्या विरोधात शीव पोलीस ठाणे, मुंबई पोलीस आयुक्त, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. तर मुनव्वर फारूकी याच्या विरोधातही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने खार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. यांसह दोन्ही कार्यक्रमाच्या स्थळी हिंदुत्वनिष्ठांनी आयोजकांची भेट घेऊन त्यांना कार्यक्रम रहित करण्याची मागणी केली होती. कार्यक्रम रहित न केल्यास हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर हे दोन्ही कार्यक्रम रद्द झाले आहेत. अशा हिंदुद्वेषी प्रवृत्तींचे कार्यक्रम यापुढे होऊ नयेत, या दृष्टीने सनदशीर मार्गाने आमचा विरोध चालूच ठेवू, असे सुनील घनवट म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.