मुंबई शहरातील वायू प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) वतीने जारी करण्यात आलेल्या नियमावलींचे पालन न करणाऱ्या सुमारे २९५५ कामांना पुर्वसूचना देण्यात आल्या आहेत. त्यातील ६०३ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर, ८५९ बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस जारी करण्यात आली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे, मुंबईत सुरू असलेल्या सर्व बांधकाम व्यवसायिक, शासकीय, निमशासकीय आस्थापनांनी प्रदूषणविषयक नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे,अन्यथा त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशाने प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी मुख्य अभियंता (रस्ते आणि वाहतूक) यांच्यासमवेत शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३ रोजी डी विभागात पाहणी केली. या वेळी त्यांना ग्रँड रोड भागातील स्लेटर मार्गावर एम.ई. इन्फ्रा आणि एन.सी.एंटरप्रायझेस यांच्याकडून सुरू असलेल्या बांधकामादरम्यान महानगरपालिकेच्या वतीने प्रदुषण नियंत्रणाबाबत जारी केलेल्या नियमावलींचे पालन होत नसल्याचे आढळून आले.
यामध्ये बांधकामाच्या ठिकाणी बॅरीकेडींग करण्यात आलेली नव्हती, समाधानकारक स्वच्छता नव्हती, राडारोडा पडून होता. त्यामुळे, बांधकामाच्या ठिकाणी बॅरीकेडींग करावी, ठराविक कालावधीनंतर स्वच्छतेच्या अनुषंगाने मनुष्यबळ नेमावे, घनकचरा व्यवस्थापन कार्यालयाजवळील राडारोडा तत्काळ काढावा, कामादरम्यान जल वाहिनी किंवा वीजेच्या केबल्सला हानी पोहोचणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच महानगरपालिकेच्या वतीने प्रदुषण नियंत्रणासंदर्भात जारी केलेल्या नियमावलींचे तंतोतंत पालन करावे, अशी नोटीस एम.ई. इन्फ्रा आणि एन.सी.एंटरप्रायझेस यांना बजावण्यात आली तसेच दोन लाख रुपयांचा दंडही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार ठोठावण्यात आला आहे.
मुंबई शहरातील वायू प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नियमावलींचे पालन करण्यात कुचराई करणाऱ्या एम.ई. इन्फ्रा आणि एन.सी.एंटरप्रायझेसला शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३ रोजी महानगरपालिकेच्या वतीने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियमांच्या अधीन राहून पुढील तीन दिवसांत अटींची पूर्तता न केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, अशी नोटीसही एम.ई. इन्फ्रा आणि एन.सी.एंटरप्रायझेस यांना बजावण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
विशेष म्हणजे शहरातील वायू प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नियमावलींचे पालन करण्यात कुचराई केल्याप्रकरणी हा दंड आकारला असला तरी दंड आकारण्याची जी कारणे दाखवली आहेत ती वायु प्रदूषणाच्या नियमात नसून प्रत्यक्षात निविदा अटींच्या उल्लंघन प्रकरणात मोडते. त्यामुळे वायु प्रदूषणाच्या नावाखाली आता महापालिका आपल्याच कंत्राटदारांना टार्गेट करायला लागली असल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. प्रशासनाने ही कारवाई निविदेतील अटींचे पालन केले नाही म्हणून ही कारवाई केली असे दाखवले असते तर या कारवाईला महत्व उरले असते आणि कुणाच्या मनात शंकाही आली नसती असे निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.