मुंबईतील जनतेला वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेला आता स्वत:चाच कर्मचाऱ्यांना वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध करून देता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील महापालिका मुख्यालय इमारतीसमोर सध्या मेट्रो रेल्वेचे काम सुरु असल्याने महापालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना (Municipal Employees) महापालिका इमारत क्रमांक ७ शेजारी प्रवेशद्वाराशेजारील जागेत दुचाकी उभ्या करण्याची पर्यायी वाहनतळ उपलब्ध करून दिले होते. परंतु याच जागेवर आता पोलिसांनी नो पार्किंगचे फलक लावले असून महापालिका कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी आपली वाहने कुठे उभी करावी हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयातील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांकरिता आझाद मैदान परिसरातील व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्गा शेजारील जागेत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु मागील चार वर्षांपासून याठिकाणी मेट्रो रेल्वेचे काम सुरु असल्याने येथील वाहन पार्किंग बंद करून याजागेऐवजी मुख्यालयालगत विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक ७ जवळील परिसरात वाहने उभी करण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.
(हेही वाचा-E-Visa: कॅनडासाठी ई-व्हिसा पुन्हा सुरू, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती)
परंतु, मागील काही दिवसांपासून याठिकाणी नो पार्किंगचे फलक लागले गेले असून याठिकाणी उभ्या केलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मागील काही दिवसांपासून ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे दुचाकींवर सातशे रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी याबाबत शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देत या प्रकरणाकडे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच येथील महापालिका कर्मचाऱ्यांसाठी असलेले वाहनतळ मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या वाहनतळाची जागा उपलब्ध होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून ही जागा कायम राखली जावी,अशी मागणी की आहे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर कोणतीही कारवाई करु नये, ही विनंती केली आहे.
महापालिका मुख्यालयाशेजारी एका वाहनतळाची जागा टाईम्स ऑफ इंडियाला आंदण दिलेली असून एका बाजुला टाईम्स ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांची वाहने सुरक्षित उभी राहतात. मात्र, दुसरीकडे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहने उचलून नेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जी महापालिका मुंबईतील जनतेला वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून देत असतानाच महापालिकेच्या अधिकार व कर्मचाऱ्यांसाठी मात्र वाहने उभे करण्यासाठी कुठेच जागा नसल्याने सध्या त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे फलक महापालिकेच्यावतीने लावण्यात आले नसून पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांना याबाबत कळवले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community