मुंबईत मागील काही महिन्यांपासून आगींच्या दुघर्टनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने शॉर्टसर्कीटमुळे आगी लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शॉर्टसर्कीटमुळे लागणाऱ्या आगीचे प्रकार टाळण्यासाठी ठराविक वर्षांनंतर आपल्या घराचे तसेच इमारतीचे वीज जोडणीचे ऑडीट करून त्याप्रमाणे ते बदलण्यात यावे किंवा वीज रोधक यंत्रणा बसवण्याच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र, याबाबत कोणतीही जनजागृती नसल्याने मुंबई महापालिकेने आपल्या विभाग कार्यालयापासूनच याची सुरुवात केली असून २४ प्रशासकीय कार्यालयांच्या इमारतींपैकी शहरातील डी विभाग व जी उत्तर विभाग कार्यालयांमध्ये वीजरोधक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ही कार्यालये आता शॉकप्रुफच नाही तर फायरप्रुफही होणार आहेत.
विजरोधक यंत्रणा बसवणार
महापालिकेच्या डी विभाग व जी उत्तर विभाग कार्यालयांच्या इमारतीचे विजेपासून संरक्षण व्हावे याकरता विजरोधक यंत्रणा बसून जुन्या विद्युत तारा बदलून नव्याने बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ९२ लाख रुपये खर्च करून या दोन्ही कार्यालयांमधील जुन्या विद्युत तारांचे ऑडीट करून जुन्या ऐवजी नवीन विद्युत तारा टाकण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी मेसर्स पाटील इलेक्ट्रीकल या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
( हेही वाचा: मुंबई महापालिकेत ‘आधार व्हेरिफाईड फेसियल’ हजेरी दीड वर्षांपासून लटकली! )
महापालिका प्रशासनाचा निर्णय
मागील काही महिन्यांत इमारतींमधील आगींच्या दुघर्टनांच्या पार्श्वभूमीवर १५ मीटर उंच किंवा पाच मजल्यांपेक्षा अधिक उंच असलेल्या इमारतींमध्ये दर एक वर्षांनी इलेक्ट्रीक ऑडीट तसेच फायर ऑडीट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासन तथा मुंबई अग्निशमन दलाने घेतला होता. परंतु इलेक्ट्रीक ऑडीटबाबत जागरुकता नसल्याने महापालिकेने आपल्या कार्यालयापासूनच याची सुरुवात केली आहे. महापालिकेच्या डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी याबाबत बोलताना, या विभाग कार्यालयातील अनेक विद्युत तारा लोंबळकत आहेत, तर काही जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे यांचे ऑडीट करून विद्युत तारा एकत्रपणे टाकण्यात येत आहे. अशाप्रकारच्या जुन्या आणि लटकणाऱ्या विद्युत केबल्स तसेच बोर्डमुळे शॉटसर्कीटची घटना घडते. त्यामुळे ही कार्यालये विद्युत रोधक बनवण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत येणारी सर्व कामे केली जाणार आहेत. ज्यामुळे हे कार्यालय शॉकप्रुफ तसेच फायरप्रुफही बनेल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community