मेट्रो कारशेडच्या जागेवर महापालिकेच्या कामालाच मनाई

मुंबई मेट्रोने महापालिकेला कोणत्याही प्रकारे सूचना न देता तसेच परवानगी न घेता हा भराव टाकला आहे.

मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित करुन त्यावर भराव टाकण्यात आला. मात्र, हा भराव टाकताना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पर्जन्य जलवाहिनींची व्यवस्थाच करण्यात आली नाही. परिणामी आसपासच्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरत असून, आता महापालिकेच्यावतीने पर्जन्य जलवाहिनी टाकण्याच्या कामालाच मिठागर आयुक्तांनी मनाई केली आहे. त्यामुळे याठिकाणी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्णपणे थांबले असले, तरी महापालिकेने आपत्कालीन कायद्याचा वापर करत हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांना होतो त्रास

आरे कॉलनीतील जागेवर मेट्रो रेल्वेचे प्रस्तावित कारशेड रद्द करुन, कांजूरमार्ग येथील जागेत हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेचा ताबा घेऊन त्यावर त्वरीत कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे कांजूरमार्गच्या प्रस्तावित कारशेडसाठी भराव टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या भरावामुळे आसपासच्या वस्त्यांमध्ये येथील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने, प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

(हेही वाचाः मेट्रो- २,७ चाचणी शुभारंभ! प्रकल्पाचे जनक फडणवीसांना नाही निमंत्रण! )

महापालिकेची परवागनी न घेता टाकला भराव

कांजूर पश्चिमेकडून नाले हे पूर्वेकडे वाहत येत असतात. ज्याठिकाणी भराव केला आहे, त्याच ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्यांचे नैसर्गिक उगम केंद्र आहेत. त्यामुळे याठिकाणी भराव केल्यास सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची कल्पना असूनही मुंबई मेट्रोने महापालिकेला कोणत्याही प्रकारे सूचना न देता तसेच परवानगी न घेता हा भराव टाकला आहे. परिणामी सांडपाणी जमा होऊन आसपासच्या विभागांमध्ये डासांचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे.

मिठागर आयुक्त कार्यालयाची हरकत

त्यामुळे स्थानिक भाजप नगरसेविका सारीका मंगेश पवार यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या प्रमुख अभियंत्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर, येथील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी सिमेंट पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. परंतु हे पाईप टाकण्यासच मिठागर आयुक्तांनी हरकत घेतली आहे. मिठागर आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून मिठागर विभागाचे उपअधिक्षक(भांडुप) ए .के. श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीने एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना नोटीस पाठवली असून, त्यामध्ये मिठागराच्या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने आपण याठिकाणी काम करू नका, असे म्हटले आहे.

(हेही वाचाः …तर ईशान्य मुंबईत लोकांच्या घरात शिरेल पाणी! भाजपला वाटते भीती)

पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या

मात्र, पावसाच्या पाण्यामुळे पुरस्थिती निर्माण होणार असल्याने, महापालिकेने आपत्कालीन कायद्याचा वापर करत या भरावाच्या ठिकाणी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत टाकले जाणारे पाईप छोट्या आकाराचे आहेत. किमान या भागातील ५० टक्के पाण्याचा निचरा होईल अशाप्रकारे तरी पर्जन्य जलवाहिनी टाकायला हवी. त्यामुळे हे पाईप टाकूनही फारसा परिणाम जाणवणार नाही, असे स्थानिक नगरसेविका सारीका पवार यांचे म्हणणे आहे.

नगरसेवकांनी व्यक्त केले आश्चर्य

मिठागर आयुक्तांनी अशाप्रकारे महापालिकेला नोटीस पाठवणे म्हणजे मेट्रोच्या कामालाच हरकत घेण्यासारखे आहे. विशेष म्हणजे या मिठागराच्या जमिनीवर पंधरा हजारांहून अधिक ट्रक भरुन मातीचा भराव याठिकाणी टाकला जात असताना, त्याला कोणत्याही प्रकारे मनाई करण्यात आली नाही. पण आता मिठागर आयुक्तांकडून महापालिकेच्यावतीने भरावामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने, पर्जन्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मनाई केली जात आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेविका सारीका पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.

(हेही वाचाः महापालिकेची निवडणूक घ्यायची कि नाही‌?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here