माध्यमिक शालांत परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून उत्तम गुणांनी सर्वप्रथम उत्तीर्ण झालेल्या २५ विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. सोबतच या २५ विद्यार्थ्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही महानगरपालिका करेल. ९५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, ९० ते ९४.९९ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांचा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सन्मान करण्यात आला. दादर (पूर्व) येथील लोकमान्य टिळक कॉलनी परिसरातील योगी सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये उत्तम गुणांनी सर्वप्रथम उत्तीर्ण झालेल्या २५ विद्यार्थ्यांचा प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २४९ माध्यमिक शाळा मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये कार्यरत असून या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सन २०२३ च्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवत नावलौकिक कमावला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या एकूण ५९ विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र, शब्दकोश, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या. ‘मला सॉफ्टवेअर इंजिनिअरींगमध्ये करियर करायचे आहे. पण त्यासोबतच समाजासाठीही योगदान द्यायचे आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने मोठे व्हायचे स्वप्न नक्कीच बाळगावे, त्यासाठी खूप मेहनतीची तयारीही ठेवावी’, असे मनोगत महानगरपालिकेच्या शाळांमधून अव्वल स्थान पटकावलेल्या शुभम सिंहने मांडले. ‘महानगरपालिकेच्या शिक्षकांनी वर्षभर तयारी करून घेतल्यानेच मला हे यश मिळू शकले. आता या प्रयत्नांच्या बळावर मला एअरोनॉटीकल इंजिनिअर व्हायचे आहे’, अशी भावना महानगरपालिकेच्या शाळांमधून द्वितीय आलेली तेजस्वी चौरसिया हिने व्यक्त केली.
(हेही वाचा – Ranjit Savarkar : अमरावतीत सावरकरी विचारांचा जागर; रणजित सावरकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली)
‘महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असल्याबाबत आधी काही लोक मला हिणवायचे. पण, त्याच महानगरपालिकेच्या शाळेत शिकून मी ९४ टक्के गुण प्राप्त करून माझी आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची दर्जेदार प्रतिमा सिद्ध करून दाखवली. महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असल्याचा कोणताही न्यूनगंड न बाळगता मेहनत करून स्वत:ला सिद्ध करून दाखवावे,’ अशी भावना तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्मिता पटेल या विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे.
पुढच्या पिढीला बदलायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. दर्जेदार शिक्षणाचे हे पवित्र काम महानगरपालिकेच्या शाळांमधून उत्तमप्रकारे सुरू आहे. यंदा पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी, शाळा तसेच शिक्षकांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याप्रसंगी काढले. या गुणगौरव सोहळ्यास आमदार कालिदास कोळंबकर, सह आयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी., सहायक आयुक्त (एफ उत्तर) चक्रपाणी अल्ले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, सोनाली वगळ, संजीव गाला आदींची या सोहळ्यास उपस्थिती होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community