महापालिकेचे भंगारही कोट्यावधी रुपयांचे

139

मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विकासकामांचे कंत्राट मूल्य हे कोट्यावधी रुपयांमध्ये असते. परंतु महापालिकेचे भंगारही कोट्यावधी रुपयांमध्ये निघत असून, केवळ जुन्या भंगारातील जलवाहिन्यांचे मूल्य ऐकून आपले डोळे गरागरा फिरतील. जलवाहिन्यांच्या या भंगाराचे मूल्य थोडेथोडके नाही, तर तब्बल ३२ कोटी २६ लाख एवढे आहे. त्यामुळे कोट्यवधीत खेळणाऱ्या महापालिकेचे भंगारही कोट्यवधीत निघत असल्याने, ही महापालिका सोन्याची अंडे देणारी, असे का म्हणतात याचे उत्तर जनतेला मिळाले असेल.

कोट्यवधी मिळणार

मुंबई महापालिकेच्या बाळकुम ते मुलुंड व मुलुंड ते सॅडेल टनेलपर्यंतच्या १८०० मि.मि व्यासाच्या दोन जुन्या जलवाहिनी बदलण्यात आल्या. या दोन्ही जलवाहिन्यांचे भाग कापून ठेवण्यात आले आहेत. या जलवाहिन्यांच्या लोखंडी तुकड्यांचे भंगार तब्बल ७० लाख ६८ हजार किलो एवढे आहे. तर भांडुप अँकर ब्लॉक पर्यंत पूर्व व पश्चिम बाजूस असणाऱ्या १८०० मि.मि व्यासाच्या जुन्या जलवाहिनी बदलण्यात आल्या. या जुन्या झालेल्या जलवाहिनीचे लोखंडी भंगार हे २९ लाख ५० हजार किलो एवढे आहे. दोन्ही ठिकाणचे भंगार हे १ कोटी १८ हजार किलो एवढे आहे. त्यामुळे या भंगाराची विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, हे भंगार जीएसटीसह ३२ रुपये २१ पैसे एवढ्या दरात ए.आय.एफ.एस.ओ. टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खरेदी करणार आहे. त्यामुळे या सर्व भंगारसामानाच्या विक्रीतून महापालिकेला ३२ कोटी २६ लाख ७९ हजार ७८० रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

भंगारात कंत्राटदाराला लॉटरी

या भंगारसामानाच्या विक्रीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जुन्या जलवाहिनी ब्रिटीशकालीन आहेत. या लोखंडाचे मूल्य लक्षात घेता, याची किंमत अधिक आहे. परंतु याच कंत्राटदाराची निवड ४ नोव्हेंबर २०२० रोजी स्थायी समितीच्या मंजुरीने करण्यात आली होती. या कंत्राटदाराने विविध १६ प्रकारच्या भंगार मालाची खरेदी करण्यासाठी ३२ रुपये २१ पैसे असा दर आकारला होता. त्याच दरात या जुन्या जलवाहिनीचे भंगार खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे एकप्रकारे या कंपनीवर महापालिकेसह स्थायी समितीनेही मेहरबानी दाखवली असून, या भंगारासाठी निविदा काढली असती तर यापेक्षा अधिक दर मिळाला असता आणि महापालिकेच्या तिजोरीत अधिक भर पडली असती. परंतु केवळ एका कंपनीला मदत करण्यासाठी मागील वेळी भंगाराच्या खरेदी करणाऱ्या कंपनीशी कोणत्याही प्रकारे वाटाघाटी न करता, तसेच दर वाढवून न घेता त्यांना हे भंगार देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचेही बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.