ल्युडो गेममध्ये सतत जिंकणाऱ्याची हत्या, मालाडमधील धक्कादायक प्रकार!

आरोपी अमितने अपघाती मृत्यू झाल्याचे बोगस प्रमाणपत्र बनवून तुकारामाच्या कुटुंबियांना अपघाती मृत्यू झाल्याचे सांगून मृत्यूचे प्रमाणपत्र देऊन मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले.

स्मार्ट फोनमध्ये असलेल्या ल्युडो गेम खेळण्याचे वेड लहानापासून मोठ्यांना लागले आहे. या गेममध्ये सोंगटी मारल्यामुळे अनेकांमध्ये वाद होत असल्याचे ऐकिवात आहे. मात्र या गेमवरून हत्या झाल्याची पहिलीच धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. हत्येनंतर मित्राने रुग्णालयाला पैसे देऊन अपघाती मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र मिळवून मृतदेहाची विल्हेवाट देखील लावण्यात आली होती. पश्चिम उपनगरातील मालाड येथे घडलेल्या या घटनेची सत्यता समोर येताच कुटुंबीयांनी मित्राच्या विरुद्ध मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

सतत गेम जिंकत असल्यामुळे मित्र चिडला!

तुकाराम नलावडे (५२) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तुकाराम नलावडे हा मालाड पश्चिम दारूवाला कंपाउण्ड येथे कुटुंबियांसह राहण्यास होता. तुकारामाला दारूचे व्यसन होते त्यातच तो १७ मार्च रोजी कोरोनाची लस घेऊन आला होता व मित्रांसोबत घरापासून काही अंतरावर असलेल्या एका मैदानात मित्र अमित राज पोपट उर्फ जिमि (३४) याच्यासोबत मोबाईलमध्ये ल्युडो गेम खेळात होता. ल्युडो खेळताना तुकाराम हा सतत गेम जिंकत असल्यामुळे अमित चिडला आणि दोघात भांडण झाले. या भांडणात अमितने तुकाराम ला धक्का देताच तो जमिनीवर कोसळून त्याच्या डोक्यला मार लागून तो निपचित पडला. घाबरलेल्या मित्र अमितने तुकाराम नशेत पडला असा कांगावा करून परिसरात लोकांना जमा  केले. त्यानंतर स्थानिकांनी त्याला रुग्णवाहिकेतून बोरिवलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

(हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये व्यापारी ‘रस्त्यावर’!)

अपघाती मृत्यू झाल्याचे सांगून मृत्यूचे प्रमाणपत्र बनवले!

त्यानंतर अमित याने रुग्णवाहिकेच्या चालकाच्या मदतीने रुग्णालयातील डॉक्टरला १० हजार रुपये देऊन अपघाती मृत्यू झाल्याचे बोगस प्रमाणपत्र बनवून घेतले. त्यानंतर अमितने तुकारामाच्या कुटुंबियांना तुकारामाचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगून मृत्यूचे प्रमाणपत्र देऊन मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले. तुकारामला दारूचे व्यसन होते, त्यातच तो त्या दिवशी लस घेऊन आला होता म्हणून चक्कर येऊन पडला असावा हे खरे वाटले आणि कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीसाठी स्म्शाण भूमीत आणला. त्या ठिकाणी तुकारामच्या मृतदेहावर अंत्यविधी झाल्यानंतर शोकसभेसाठी जमा झालेल्यापैकी एकाने तुकाराम यांच्या पत्नीला तुकाराम याचा मृत्यू अपघातात जाहलेला नसून त्याला मारहाण करण्यात आली त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. पतीची हत्या झाल्याचे कळताच तुकारामच्या पत्नीने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौकशीसाठी मित्र अमित याला ताब्यात घेऊन त्याच्यकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. याप्रकरणी बोगस मृत्यूचे प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या डॉक्टरची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी  सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here