कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक उत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना मोठ्या प्रमाणात सजावट न करता अत्यंत साध्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. पण यामध्ये मुंबईच्या महाराजाने कोरोना काळातही आपले वेगळेपण जपले. मुंबईच्या महाराजाची मूर्ती यंदा खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीत अवतरली आहे. चार फुटांपर्यंतची ही गणेशमूर्ती चक्क टिश्यू कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक अशी बनवलेली आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर राखून बाप्पांचे दर्शन घेताना महाराजांच्या इतिहासाची उजळणी आपल्या स्मृतीपटलावर होणार आहे.
साधेपणाने उत्सव
कोविडच्या नियमावलीनुसार थेट दर्शन किंवा मुख दर्शनाला बंदी असली, तरी प्रत्यक्षात अनेक मंडळांनी परंपरेनुसार उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. परंतु या मंडळांमध्ये कोविड नियमावलींमुळे निरुत्साह असला तरी काही मंडळांनी आकर्षक सजावट आणि चलतचित्रपटांच्या देखाव्यांकडे न वळता साधेपणाने का होईना उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे उंचीची स्पर्धा करत घडवल्या गेलेल्या गणेशमूर्ती आणि अवाढव्य असे मंडप उभारुन मंडळांच्या श्रीमंतीचे दर्शन देणारी अनेक सार्वजनिक मंडळे, आता अगदी छोटेखानी मंडप उभारुन बाप्पांची चार फुटांची मूर्ती उभारुन उत्सव साजरा करत आहेत.
(हेही वाचाः विसर्जनाच्या पहिल्याच दिवशी कोविड नियमांचे झाले निर्माल्य)
नियम पाळत उत्सव
ग्रँटरोड येथील खेतवाडी ११व्या गल्लीतील मुंबईचा महाराजा उत्सव मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवरातात चार फुटांची गणेशमूर्ती साकारत त्यांची प्रतिष्ठापना केली. या मंडळाचा बाप्पाही यंदा महाराजांच्या रुपात आल्याने महाराजांचा इतिहास पोवाड्यांच्या माध्यमातून भाविकांना ऐकवला जात आहे. हे मंडळाचे हिरक महोत्सवी वर्ष आहे, तशी या मंडळाची नेहमीची गणेशमूर्ती उंच असते. यापूर्वी ३० आणि ३७ फुटांची गणेश मूर्ती साकारली होती. ज्या स्वरुपात गणेशमूर्ती साकारली जाते, त्याचप्रकारचा देखावाही साकारला जातो. परंतु मागील वर्षी कोविडमुळे ४ फुटांऐवजी २ फुटांची मूर्ती बसवून नियमांचे पालन केले होते. त्यावेळेला कोविडबाबतची प्रचंड भीती होती. पण आता काही प्रमाणात सुरळीत झाले आहे. पण आम्ही नियमांचे पालन करत हा उत्सव साजरा करत आहोत. येथील जी गणेशमूर्ती आपण पाहता ती टिश्यू पेपरच्या लगद्यापासून बनवलेली असून, चार माणसे अगदी सहजपणे ती उचलू शकतात, असे मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष गणेश वडवेल यांनी सांगितले.
(हेही वाचाः सार्वजनिक उत्सव मंडळांमधील उत्साह मावळतोय का?)
एक वर्षाआधीच ठरली संकल्पना
ही मूर्ती आपल्याला महाराजांच्या रुपात दिसत आहे. त्यानुसारच यंदाची थिम असून महाराजांचा इतिहास उलगडून सांगणारे पोवाडेच इथे लावले जातात. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राज्याबाहेरुन आलेल्यांना माहीत नाही. महाराजांच्या पराक्रमाची गाथा इतर लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा इतिहास त्यांना समजावा याकरताच ही थिम निवडली आहे. अशाप्रकारची संकल्पना एक वर्ष आधीच ठरलेली होती, असेही वडवेल यांनी सांगितले.
मंडळाचे सार्वजनिक उपक्रम
मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोविड लसीकरण शिबिर राबवण्याचाही विचार होता, परंतु ते रद्द करण्यात आले. पण मंडळाच्यावतीने कोविड काळात अनेकांना अन्नवाटप करण्यात आले होते. शिवाय पालघर जिल्ह्यातील दोन आदिवासी पाड्यांमधील तीन शाळांमध्ये शालेय वस्तूंचे वाटप केले आहे. अजूनही काही शाळांमध्ये अशाप्रकारच्या साहित्याचे वाटप करण्याचाही विचार असल्याचे वडवेल यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः कृत्रिम तलावांकडे वळू लागले भाविक! दीड दिवसांच्या इतक्या मूर्तींचे विसर्जन)
Join Our WhatsApp Community