Myanmar Cyber Slavery : महाराष्ट्र पोलिसांनी म्यानमारमधील ‘सायबर गुलामगिरी’तून ६० भारतीयांची केली सुटका

146
Myanmar Cyber Slavery : विदेशात नोकरीचे आमिष (Job lure) दाखवत सायबर गुलाम बनविलेल्या ६० भारतीयांची म्यानमारमधून सुटका करण्यास महाराष्ट्र सायबरला पोलिसांना (Maharashtra Cyber ​​Police) यश आले आहे. याप्रकरणी राज्य सायबरने तीन गुन्हे नोंदवत मनीष ग्रे उर्फ मॅडी, तैसन उर्फ आदित्य रवी चंद्रन, रूपनारायण रामधर गुप्ता, आणि जेन्सी रानी डी या चार भारतीयांसह तलानीती नुलाक्सी चीन/कझाकस्तानी नागरिक अशा पाच आरोपींना अटक केली आहे. (Myanmar Cyber Slavery)
म्यानमारमध्ये नेलेल्या काही तरुणांनी कुटुंबीयांशी संपर्क साधत येथून सुटका करण्याची विनंती केली. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मदतीची मागणी केली. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केंद्र सरकारच्या मदतीने ऑपरेशन राबवत एकूण ६० जणांची सुखरूप सुटका केली आहे. मुख्य आरोपींपैकी एक असलेला मनीष ग्रे/मॅडी (Manish Grey/Maddy) हा अभिनेता असून त्याने वेब मालिका आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. थायलंडमध्ये रोजगाराच्या संधी मिळवून देण्याच्या नावाखाली व्यक्तींची भरती करणे, त्यांची म्यानमारमध्ये तस्करी (Myanmar smuggling Case) करणे यात त्याची मुख्य भूमिका होती. तो म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि भारतासह अनेक ठिकाणांहून सक्रियपणे कार्यरत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

(हेही वाचा – मुलींच्या सुरक्षेसाठी समाजाने सजग होणं गरजेचं; Dr. Neelam Gorhe यांचे आवाहन)

सुरू होता गुलामगिरीचा जाच…
सशस्त्र बंडखोरांच्या ताब्यात दिल्यानंतर पीडितांना एका कंपाउंडमध्ये कोंडले जाते. त्यानंतर सायबर फसवणूक, शेअर्स ट्रेडिंग, गुंतवणूक, टास्क, डिजिटल अटक अशी कामे करण्यासाठी त्यांचा छळ होत असे. त्यास विरोध करताच त्यांच्या शरीराचे भाग काढून त्यांची विक्री करण्याची धमकी दिली जात होती. सर्वत्र सशस्त्र बंडखोर तैनात असल्याने येथे तरुणांना जीवाच्या भीतीने काम करावे लागत असल्याचे तरुणांच्या चौकशीत समोर आले.
सोशल मीडियाचा वापर
फेसबूक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया अॅपवर विदेशातील नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना एजंट आपल्या जाळ्यात ओढायचे. पुढे, चांगले संभाषण करणाऱ्या तरुणांची निवड करुन त्यांचा पासपोर्ट तयार करत व्हिसा, विमान तिकिटांची व्यवस्था करुन तरुणांना टुरिस्ट व्हिसावर थायलंडला पाठवले जात होते.
नदीवाटे थेट जंगलात
थायलंडला (Thailand) उतरल्यानंतर टोळीतील एक एजंट सोबत जातो किंवा त्या तरुणांचे फोटो तेथील एजंटला पाठविले जातात. थायलंड विमानतळावरुन पुढे नोकरीच्या ठिकाणी पाठवले जाईल असा आभास तयार करून तेथील एजंट तरुणांना थायलंड-म्यानमार सीमेच्या दिशेने सात ते आठ तास प्रवास करून नेतात. आधीच पासपोर्ट काढून स्वतःकडे घेतात. पुढे, थायलंडमधून म्यानमारमध्ये प्रवेश करण्यासाठी लहान बोटीतून नदी ओलांडून या तरुणांना येथील सशस्त्र पहाऱ्यात असलेल्या म्यावाड्डी परिसरात नेले जाते.

(हेही वाचा – पाणी वापराचे लेखापरीक्षण करा; जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांची सूचना)

पाच हजार डॉलरमध्ये माझाच सौदा

हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करत होतो. चांगला पगार होता. सगळे सुरळीत सुरू होते. एका टोळीच्च्या जाळ्यात अडकून विदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीच्या मोहात थायलंड गाठले. मात्र, तेथून आलिशान कार्यालयात न पोहोचता म्यानमारच्या निर्जन कंपाउंडमध्ये पोहोचलो. तेथे माझा पाच हजार डॉलरमध्ये सौदा झाला. एका जंगलाच्या कोपऱ्यात जिथे आजूबाजूला फक्त शस्त्र घेऊन असलेली पहारेकरी. मारून झोडून सगळी कामे करून घेत होते, असे म्यानमारमधून सुटका झालेला सतीश सांगतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.