नागपूर पोलिसांना आता भटक्या श्वानांवर नजर ठेवून करावी लागणार गणना

134

नागपूर शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना आता कुख्यात गुन्हेगारांबरोबर शहरातील भटक्या श्वानांवर नजर ठेवून त्यांची गणना करावी लागणार आहे. त्यासंदर्भात डेटा गोळा करावा लागणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 44 अंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूरच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशनसाठी असे परिपत्रक जारी केले आहे.

त्यानुसार पोलीस स्टेशन परिसरात किती मोकाट कुत्रे आहेत, याबाबत शहानिशा करुन त्याबद्दलची माहिती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आणि संबंधित माॅनिटरिंग कमिटीला सूचित करावे, अशा सूचनाही या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

याशिवाय पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या तीन वर्षात किती मोकाट कुत्र्यांनी लोकांना चावे घेतले आहेत, याबाबतच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याचे संकलनही पोलीस स्टेशनला करावे लागणार आहे. तसेच, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक भटक्या कुत्र्यांना नियमितपणे रस्त्यावरील एका ठिकाणी अन्न टाकतात का यावर लक्ष देण्याच्या सूचनाही या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: प्रवीण दरेकर यांना मुंबै बॅंक घोटाळा प्रकरणात क्लीन चिट )

नागपूरमध्ये डिसेंबरपासून कुत्र्यांच्या नसबंदीला होणार सुरुवात

नागपूरमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नसबंदी आणि अॅन्टी रेबीज वॅक्सिन लावण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टला सुरुवात होणार आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागूपर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर मनपाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने मनपाला फटकारले होते. ऑगस्ट 2020 मध्ये कोरोना संक्रमणामुळे नसबंदीची प्रक्रिया पूर्णत: थांबली होती. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.