नागपुरात रुग्णवाढ ०.१० टक्के! निर्बंध शिथिल करा!

नागपुरात तर सरासरी ५ रूग्ण दररोज आढळून येत असताना संपूर्ण नागपूर बंद ठेवणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

79

नागपुरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. सातत्याच्या लॉकडॉऊनमुळे आधीच विविध छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

नागपुरात रुग्ण वाढीचा दर ०.१० टक्के!

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बर्‍याच अंशी सुधारली आहे, तेथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्याची गरज आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला कोरोनावर मात करावी लागेल. कोरोनाविरोधातील लढाई ही एकांगी होता कामा नये. आर्थिक विवंचनेमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कल्याणमध्ये व्यापार्‍याने आत्महत्या केली, नालासोपार्‍यात एका युवकाने जीवन संपविले, चंद्रपुरात एका भोजनालय चालकाने आत्महत्या केली. नागपुरातील कोरोनाच्या गेल्या १० दिवसांतील स्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. १७ ते २७ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत नागपुरात एकूण झालेल्या चाचण्या ५९,९४८ इतक्या आहेत, तर त्यात कोरोना संसर्ग आढळून आलेले रूग्ण ५८ इतके आहेत. हे प्रमाण ०.१० टक्के इतके आहे. त्यामुळे आता नागपुरात तातडीने निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे.

(हेही वाचा : ठाकरे सरकार टिकून राहावे ही राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा!)

छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण! 

सातत्याच्या निर्बंधांमुळे व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे दुकानदार, व्यावसायिक यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. हॉटेल्सचा व्यवसाय खरे तर दुपारी ४ नंतर सुरू होतो. पण, ४ वाजता सारे बंद करावे लागत आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने नोकरदारांना वेतन देणे सुद्धा या व्यावसायिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती जेथे बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे, तेथे निर्बंधात तातडीने शिथिलता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा. नागपुरात तर सरासरी ५ रूग्ण दररोज आढळून येत असताना संपूर्ण नागपूर बंद ठेवणे योग्य नाही. नागपूरबाबत हा निर्णय तातडीने घेतला जावा, अशी मागणी या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.