नागपूर, पुणे, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात नवजात मृत्यूचे (Increase Mortality Rate) प्रमाण जास्त आहे. राज्यात दर ३९ मिनिटाला एका नवजात बालकाचा मृत्यू होतो, यासंदर्भात 2022-23 मधील माहिती अधिकाराअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे.
यासंदर्भात भारतीय वंध्यत्व सोसायटीच्या विदर्भ शाखेच्या प्रमुख डॉ. सुषमा देशमुख यांनी सांगितले की, गर्भातच बाळाच्या मृत्यूला आई आणि बाळाशी संबंधित विविध कारणे असू शकतात. बाळाला गर्भात योग्य रक्त आणि प्राणवायूचा पुरवठा न होणे, विविध संक्रमण, आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवण्यास विलंब, गर्भात बाळाचा मृत्यू होणे, अशी काही कारणे बाळाच्या मृत्यूला कारणीभूत असू शकतात.
(हेही वाचा – Lonavala Tourism Development : पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचे पाऊल, लोणावळ्यात उभारणार ‘ग्लास स्कायवॉक’)
तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नवजातांचे मृत्यू कमी आहेत. शासनाच्या प्रयत्नाने 2021-22 च्या तुलनेत 2022-23मध्ये हे प्रमाण कमीही झाले. ही संख्या कमी होण्यासाठी प्रभावी उपाय सुरू असल्याची माहिती पुण्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 2019-20 साली 14 हजार 614 नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 2020-21 मध्ये 13 हजार 959 इतके नवजातांचे मृत्यू झाले. त्यानंतर मृत्यूदरात वाढ होऊन 14 हजार 296 झाला. 2022-2023 मध्ये राज्यात 13 हजार 653 मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
राज्यात 39 मिनिटाला एक नवजात मृत्यू
राज्यात दिवसाला 31.35 तर प्रत्येक 39 मिनिटाला एका बालमृत्यूची नोंद होते. माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर, पुणे, अमरावती, अकोला, यवतमाळ या पाच जिल्ह्यांची माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार, 2021-22 या 5 वर्षांच्या तुलनेत 2022-2023 मध्ये नागपूर, पुणे, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये नवजात मृत्यू वाढल्याची नोंद उघडकीस आली आहे.
बालरोगतज्ज्ञांचे मत
यासंदर्भात बालरोग तज्ज्ञ डॉ. पंकज अग्रवाल यांनी नवजात बालकांचे मृत्यू टाळण्यासाठी शासकीय किंवा खासगी रुग्णालयातच प्रसुती करण्याचा सल्ला दिला आहे तसेच शासनाने सरकारी रुग्णालयांत महागड्या जनुकीय चाचणी आणि अॅन्युमली स्कॅनची सोय केली, तर मोठ्या प्रमाणात मृत्यू टाळणे शक्य आहे, असे मत व्यक्त केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community