गरीब आणि गरजू रुग्णांना संधीवातावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार आणि मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांना उपचार मिळण्यास मदत व्हावी, या उद्देशाने नायर रुग्णालयामध्ये डिसेंबरपासून पदव्युत्तर चिकित्सा प्रतिक्षमताशास्त्र आणि संधीवातशास्त्र (क्लिनिकल इम्युनोलॉजी अॅण्ड रुमॅटोलॉजी) हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू करणारे नायर रुग्णालय हे महाराष्ट्रातील पहिले सरकारी रुग्णालय ठरणार आहे.
नायर रुग्णालयामधील संधीवातशास्त्र विभागाचा बाह्यरुग्ण विभाग आठवड्यातून दोन दिवस सुरू असतो. या विभागामध्ये आठवड्याला जवळपास १०० ते २०० रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र यासंदर्भातील पदव्युत्तर अभ्यासक्रम मोजक्याच महाविद्यालयांमध्ये शिकविण्यात येत आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या फार कमी असल्याने संधीवाताच्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेपासून वंचित राहावे लागते.
(हेही वाचा – Footpath Collapsed In Mulund : मुलुंडमध्ये फूटपाथ खचून दुचाकींचे नुकसान)
नायर रुग्णालयामध्ये संधीवाताचे पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी अन्य महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे संधीवातासाठी रुग्णालयात येणारे रुग्ण तज्ज्ञ डॉक्टरांना मुकतात. नायर रुग्णालयामध्ये संधीवाताच्या रुग्णांना विशेषोपचार मिळावेत यासाठी पदव्युत्तर चिकित्सा प्रतिक्षमताशास्त्र आणि संधीवातशास्त्र हा नवीन अभ्यासक्रम डीएनबीच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, डिसेंबरपासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
उपचार मिळण्यास मदत…
पदव्युत्तर चिकित्सा प्रतिक्षमताशास्त्र आणि संधीवातशास्त्र या अभ्यासक्रमामुळे नायरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर घडण्यास मदत होणार आहे. यामुळे गरीब रुग्णांना उत्तम व चांगले उपचार मिळण्यास मदत होईल. हा अभ्यासक्रम राज्यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये प्रथमच सुरू करण्यात येत आहे.
– डॉ. सुधीर मेढेकर, अधिष्ठाता, नायर रुग्णालय