
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थित ‘पिएरी फॉचर्ड अकॅडमी’ मार्फत दिला जाणारा अत्यंत मानाचा पुरस्कार मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला आहे. ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दंत रुग्णालय’ या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला आहे. (Nair Dental Hospital)
पिएरी फॉचर्ड अकॅडमीमार्फत श्रीलंकेतील कोलंबो येथे दंत आरोग्याशी संबंधित विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणारे रुग्णालय म्हणून नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच, आशियाई देशांमध्ये दंत वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वर्ष २०२५ साठी डॉ. नीलम अंद्राडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिएरी फॉचर्ड अकॅडमीची स्थापना सन १९३६ मध्ये झाली. आधुनिक दंतशास्त्राचे जनक मानले जाणारे फ्रेंच दंतचिकित्सक पिएरी फॉचर्ड यांच्या स्मरणार्थ व विविध क्षेत्रांतील योगदानासाठी या अकॅडमीच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. (Nair Dental Hospital)
(हेही वाचा – ‘मविआ’ मुळे राज्याच्या विकासात बाधा; Chandrashekhar Bawankule यांचा घणाघात)
पिएरी फॉचर्ड अकॅडमीसारख्या नावाजलेल्या संस्थेमार्फत झालेल्या सन्मानामुळे रुग्णांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची जबाबदारी नायर रुग्णालयावर वाढली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवाव्यात, यासाठी अधिक कटिबद्धपणे कार्य करण्यासाठी निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.भूषण गगराणी यांनी व्यक्त केला. (Nair Dental Hospital)
मुंबई महानगरपालिका संचालित व मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय दंत महाविद्यालय हे देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय आहे. याची स्थापना १९३३ मध्ये झाली. सध्या येथे एकूण २५ रुग्णशय्या व ३०० दंत उपचार खुर्ची उपलब्ध आहेत. दररोज सरासरी १,००० ते १,२०० रुग्ण तर वार्षिक सरासरी साडेतीन लाख रुग्ण दंत उपचारासाठी येथे येतात. नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या वतीने केवळ रुग्णसेवेपुरते मर्यादित न राहता अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात. (Nair Dental Hospital)
(हेही वाचा – Hyderabad Bomb Blast प्रकरणातील दहशतवाद्यांची फाशी कायम; तेलंगणा उच्च न्यायालयाचा निर्णय)
विद्यार्थी दशेत १९७९ पासून व वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून १९८७ पासून नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. नीलम अंद्राडे म्हणाल्या की, “रुग्णांसाठी समर्पण भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान या जीवनगौरव पुरस्काराने झाला, याचा मला अभिमान आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची मी अत्यंत ऋणी आहे. या एकाच संस्थेत मी ४६ वर्षे सेवा केली आहे. पूर्व शिक्षण संस्था या नात्याने मला मिळालेले शिक्षण, मुंबई महानगरपालिकेत मी बजावलेली सेवा तसेच प्रशासनाकडून मिळालेल्या पाठबळामुळे मी माझ्या व्यावसायिक, शैक्षणिक आणि प्रशासनिक सेवेमध्ये सन्मान प्राप्त करू शकले. मागील ४६ वर्षांपासून रुग्णसेवेचे भाग्य मिळाले, हे माझ्यासाठी गौरवाचे आहे,” असेही डॉ. अंद्राडे यांनी नमूद केले आहे. (Nair Dental Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community