नायर रुग्णालयातील डॉक्टरांना मिळणार थकीत कोविड भत्ता : मार्डच्या डॉक्टरांची मागणी मान्य

63

आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारणाऱ्या मार्डच्या डॉक्टरांनी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेतला. पण त्यानंतर महापालिका ‘मार्ड’च्या डॉक्टरांनी गुरुवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची भेट घेतली. या बैठकीत नायर रुग्णालयातील डॉक्टरांना जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीतील थकीत कोविड भत्ता देण्याची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा कोविड भत्याची रक्कम लवकरच मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना दहा हजार रुपये कोविड भत्ता मंजूर झाला असून जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीतील भत्त्याची ही रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे नायरमधील मार्डच्या डॉक्टरांनी कोविड भत्त्याची थकीत रक्कम मिळण्यासाठी तसेच पाचव्या वेतन आयोगानुसार मंजूर वेतन श्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१८ ते दिनांक १ जानेवारी २०२२ या कालावधीतील महागाई भत्तावाढीचा लाभ महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांना मिळावा या दोन प्रमुख मागण्यासाठी महापालिका मार्डच्या डॉक्टरांनी महापालिका अतिरिक्त डॉ संजीव कुमार यांच्यासमवेत बैठक घेतली.

सचिन पत्तीवार, डॉ ऋतुजा पुकलवार यांच्यासमवेत इंडियन मेडिकल असोशिएशनचे व महापालिका मार्डचे सल्लागार अक्षय यादव यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी नायर रुग्णालयातील डॉक्टरांचा थकीत कोविड भत्ता देण्याची मागणी मान्य केल्याची माहिती मार्डच्या डॉक्टरांनी दिली आहे. तसेच इतर शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याप्रमाणे महापालिकेच्या केईएम,शीव, नायर आणि कुपर रुग्णालयातील डॉक्टरांनाही हा भत्ता मंजूर करण्याच्या मागणीबाबत डॉ संजीव कुमार यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे याबाबत महापालिका प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ निलम अंद्राडे यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच महापालिका मार्डचे डॉक्टर वैद्यकीय संचालकांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.