नायर दंत रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले पुढील दोन महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या रुग्णालयातील इन्प्लांटोलॉजी सेंटरमुळे रुग्णांची दाताची कवळी बदलण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. शिवाय यासाठी होणारा खर्चही कमी होणार आहे. त्यामुळे कवळी बदलण्यासाठी येणारा सव्वा लाख रुपयांचा खर्च आता अवघ्या २५ हजार रुपयांमध्ये करता येणार आहे.
मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालय दंत महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी येत असतात. याठिकाणी एरवी सरासरी ३५० ते ४०० रुग्ण उपचार घेत असतात. तर गर्दीच्या दिवसांमध्ये सरासरी ६५० ते ८०० रुग्णांवर उपचार होतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अधिकाधिक रुग्णांना उपचार पुरवणे शक्य व्हावे म्हणून ११ मजली विस्तारित इमारतीच्या बांधकामाला २०१८ मध्ये सुरूवात झाली होती. परंतु कोविड काळात हे काम थांबले होते, पण त्यानंतर आता या इमारतीच्या कामाला पुन्हा वेग देण्यात आला आहे.
आता ही इमारत अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीच्या सर्व मजल्यांची, प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा घेवून काम त्वरेने पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार, या इमारतीची अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी काल पाहणी केली. राहिलेली कामे वेगाने पुढे नेण्याच्या सूचनाही त्यांनी या भेटी दरम्यान दिल्या.
अकरा मजली इमारतीमध्ये पहिले सहा मजले हे रुग्ण सुविधेसाठी असणार आहेत. तर उर्वरीत ७ ते ११ मजले विद्यार्थी वसतिगृहासाठी देण्यात येणार आहेत. रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रशस्त, सर्व सुविधायुक्त उपहारगृह सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी फेब्रुवारी महिन्यापासूनच वसतिगृह सुविधा वापरासाठी देण्यात आली आहे.
(हेही वाचा Pakistan : ‘१४ ऑगस्ट’ला दुबईतील बुर्ज खलिफाने पाकिस्तान्यांची केली दमछाक)
इमारतीमध्ये सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये क्लिनिकल विभाग, रेडिऑल़ॉजी, विद्यार्थ्यांसाठी वर्ग कक्ष, फॅन्टम आणि सिम्युलेटर प्रयोगशाळा आदींचे काम अंतिम टप्प्यात आहे. भेटीवेळी प्रत्येक वॉर्डला भेट देत अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी वास्तुविशारद आणि कंत्राटदारांनी ही कामे त्वरेने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
रुग्णांवर होणार माफक दरात अद्ययावत उपचार
दंत रुग्णांच्या वैद्यकीय उपचार सुविधेसाठी जपानहून अद्ययावत संयंत्र नायर रूग्णालयात दाखल झाले आहे. मौखिक उपचारांमध्ये जबडा आणि दातांच्या उपचारासाठी सीबीसीटी संयंत्र वापरात येणार आहे. त्यामुळे आजाराचे वेळीच आणि नेमके निदान होण्यासाठी मदत होईल. महत्वाचे म्हणजे अतिशय माफक दरात या तंत्रज्ञानाद्वारे उपचार करणे शक्य होणार आहे. मौखिक कर्करोग उपचार केंद्र, तंबाखू अधीन रुग्णांच्या तपासणीसाठी सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यांचा नव्याने समावेश या विस्तारीत इमारतीमधील विभागात असणार आहे.
इन्प्लांटोलॉजी सेंटरमुळे रुग्णांची दाताची कवळी बदलण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. महत्वाचे म्हणजे या उपचारासाठीचा खर्चही कमी होईल. दातांची कवळी बदलण्यासाठी किमान सात ते आठ वेळा रुग्णांना फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्याठिकाणी आता अवघ्या दोन फेऱ्यांमध्ये हे उपचार होतील. इन्प्लांटोलॉजी सेंटरमध्ये डिजिटायजेशन होणार असल्याने ही सर्व प्रक्रिया कमी वेळेत करणे शक्य होईल. तसेच कवळी बदलण्यासाठी सव्वा लाख रूपये इतका खर्च येतो, तिथे आता अवघ्या २५ हजार रुपयांमध्ये हे उपचार करता येतील, अशी माहिती संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा अधिष्ठाता (नायर रुग्णालय दंत महाविद्यालय) डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली आहे.
नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाने ओपन मॅगझीन क्रमवारीत महाराष्ट्रात आणि पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर भारतात चौथा क्रमांक पटकावला आहे. तसेच, एआयएआर क्रमवारीत देशात १९ वा क्रमांक मिळवला आहे. नव्या विस्तारीत इमारतीच्या सुविधांमुळे नायर रुग्णालय दंत महाविद्यालय हे देश पातळीवर पहिल्या तीन रुग्णालयात स्थान मिळवण्यात यशस्वी होईल, असा विश्वास देखील डॉ. अंद्राडे यांनी व्यक्त केला.
विस्तारीत इमारतीतील सुविधा आणि तंत्रज्ञान-
- ३ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर
- इन्प्लांटोलॉजी सेंटर
- १ डिजिटल कॅडकॅम लॅब
- ३ क्लिनिकल स्पेशालिटी विभाग
- १०० विद्यार्थी क्षमतेच्या वर्गखोल्या
- प्री क्लिनिकल विद्यार्थी प्रशिक्षण प्रयोगशाळा
- सभागृह
- आस्थापना कार्यालय
- उपहारगृह
- विद्यार्थी वसतिगृह
- क्ष किरण संयंत्र (एक्स रे मशीन)
- सीबीसीटी मशीन