बूट पॉलिशवाल्यांच्या पाठीवर नाना पालकर स्मृती ट्रस्टचा मायेचा हात!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने, रेल्वे लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठीच खुली आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवासी अधिक संख्येने नसल्याने बूट पॉलिशवाल्यांची दिवसभराची कमाईही होत नाही. परिणामी त्यांना उदरनिर्वाह करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच या बूट पॉलिश कर्मचाऱ्यांच्या पाठीवर नाना पालकर स्मृती ट्रस्टने मायेचा हात फिरवला आहे. या संस्थेच्यावतीने बूट पॉलिश करणाऱ्यांना एक महिना पुरेल इतक्या रेशन किटचे वाटप करण्यात आले आहे.

इकडे आड, तिकडे विहीर

मागील एक महिन्यापासून कडक निर्बंध लागू केल्यामुळे हातावर पोट असलेल्या पॉलिश करणाऱ्यांचा धंदाच प्रवाशांच्या अभावी बसला. दैनंदिन होणाऱ्या कमाईवर पाणी फेरले गेल्यामुळे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कशाप्रकारे चालवायचा असा प्रश्न आता बूट पॉलिश करणाऱ्यांना पडला आहे. दररोज स्थानकावर बसत असले, तरी कुणीही बूट पॉलिश करायला पुढे येत नाही. तसेच कोरोनाच्या भीतीने तर प्रत्येकजण लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दिवसाला जे काही चारशे ते पाचशे रुपये कमवले जायचे, तिथे आता शंभर रुपयांचाही धंदा होत नाही. विशेष म्हणजे यांचा जूनपर्यंतच खरा धंदा असतो. कारण पावसाळ्यात कुणीही बूट पॉलिश करायला येत नाही. त्यामुळे त्या कालावधीत बहुतांशी बूट पॉलिश करणारे गावचा रस्ता धरतात. परंतु कोरोनामुळे गावालाही जाण्याचे दरवाजे बंद असताना, इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था या कर्मचाऱ्यांची झाली आहे.

दीड महिना पुरेल एवढे रेशन

बूट पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे होणारे हाल लक्षात घेता, नाना पालकर स्मृती ट्रस्टचे व्यवस्थापन कृष्णा महाडिक यांनी पुढाकार घेत गुरुनानी सती ट्रस्टच्यामार्फत चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण यादरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील सर्व बूट पॉलिशवाल्यांना १८ वस्तूंच्या रेशन किटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी परवानगी दिल्यानंतर दहिसर, बोरीवली आणि कांदिवली या तीन रेल्वे स्थानकांवरील ३३ बूट पॉलिशवाल्यांना या किटचे वाटप करण्यात आले. तसेच उर्वरित सर्वांनाही लवकरच याचे वाटप केले जाणार असून, दीड महिना पुरेल एवढे रेशन त्यात आहे, असे नाना पालकर स्मृती ट्रस्टचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक यांनी स्पष्ट केले.

आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने गुरुनानी ट्रस्टकडे मी शब्द टाकला आणि त्यांनी ही रेशन किट उपलब्ध करुन दिल्याबद्दल महाडिक यांनी या संस्थेचे आभार मानले. तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. तीन रेल्वे स्थानकांवरील बूट पॉलिश कर्मचाऱ्यांना ही मदत दिली असून यावेळी गुरुनानी ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी मीता सोहनी, बोरीवली रेल्वे स्थानकाचे अधिक्षक खान, स्टेशन मॅनेजर अशोक वर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here