नोटा छपाई मुद्रणालयातील चोरीप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल!

चलार्थपत्र मुद्रणालयातील नोट छपाईच्या कारखान्यातील 500 रुपयांचे 5 लाख मूल्याचे 10 बंडल गहाळ झाले आहेत.

देशाच्या चलनी नोटा छपाईच्या चलार्थपत्र मुद्रणालयातील सुरक्षा व्यवस्था भेदून त्यातून सुमारे 5 लाखाच्या नोटा गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मंगळवारी, १३ जुलै रोजी प्रेसचे विधी अधिकारी प्रेसमध्ये धडकले. लागलीच गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. फेब्रुवारीमध्ये हा चोरीचा प्रकार घडला. मुद्रणालयाने याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र धागेदोरे सापडले नाही. म्हणून मुद्रणालयाने अखेर उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

चौकशी समितीला काहीच मिळाले नाही!

चलार्थपत्र मुद्रणालयातील नोट छपाईच्या कारखान्यातील 500 रुपयांचे 5 लाख मूल्याचे 10 बंडल गहाळ झाले आहेत. काही दिवसांपासून गोपनीयरीत्या प्रेसमध्ये दोन अधिकारी चौकशी समिती नेमली होती, मात्र या समितीला काही शोधता आले नाही. या प्रकरणात बरीच दिरंगाई झाल्यानंतर हे प्रकरण पोलिस यंत्रणेकडे देण्यात आले आहे. मंगळवारी जेव्हा मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलिस ठाण्यात पोहोचले, तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली. चलार्थपत्र मुद्रणालयात देशाचे चलन छापले जाते. वर्षांसाठी 4 ते साडे 4 हजार दशलक्ष नोटा छपाई करणाऱ्या या कारखान्याने नोट छपाईचे अनेक उच्चांक केले आहे. देशातील नोटाबंदी नंतर उद्भवलेल्या चलन टंचाईच्या काळात दिवसरात्र काम करुन ज्या कारखान्याने देशाची कौतुकाची शाबासकी मिळविली. त्याच मुद्रणालयात चोरीचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने प्रेसच्या लौकीकाला धक्का बसला आहे.

(हेही वाचा : ती पैशांची बंडलं प्रदीप शर्मा यांची… महिलेने दिला सीआयडीला दिला जबाब)

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

गायब झालेल्या नोटांचा हिशोब लागत नसल्याने करन्सी नोट प्रेसच्या व्यवस्थापकांच्या वतीने उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा तक्रार अर्ज दिला आहे.  या प्रकरणी अखेर पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल केली. या बाबत घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासासाठी घेण्यात येणार आहे. या मुद्रणालयात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते, तरी ही सुरक्षा भेदून पैशाचे बंडल बाहेर गेले कसे, असा प्रश्न उपस्थित राहत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here