नाशिक दुर्घटनेस जे जबाबदार असेल, त्यांची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नासिक के एक अस्पताल में ऑक्सिजन लीक होने से हुई दुर्घटना का समाचार सुन व्यथित हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। बाकी सभी मरीजों की कुशलता के लिए ईश्वर से प्रार्थना करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) April 21, 2021
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एक एका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात होतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
(हेही वाचा : ऑक्सिजनच्या गळतीने २२ रुग्ण दगावले… नाशिकच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार!)
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल, अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणतात. यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Join Our WhatsApp Community