कोरोनाबाधित मृत रुग्णाला पॅकिंग करण्यासाठी हॉस्पिटल आकरते अतिरिक्त शुल्क!

तब्बल तीन तास मृतदेह मिळावा म्हणून रुग्णालयाच्या आवारात मयत देविदास जाधव यांच्या नातेवाईकांना बसवून ठेवण्यात आले.

96

नाशिक शहरांमधील कोरोनाची परिस्थिती ही हाताबाहेर जात असल्याचे समोर येत आहे. अशातच कोरोनाने मृत्यू झालेल्या बाधितांचे मृतदेह पॅकिंग करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असतानादेखील रुग्णालयाकडून मृतदेह पॅकिंग करण्यासाठी अतिरिक्त तीन हजार रुपये मागण्यात आल्याचा आरोप एका कोरोनाने मृत्यू झालेल्या बधितांच्या नातेवाईकांनी केला आहे.

सातपुर भागातील सुशीला रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! 

काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने देविदास जाधव यांना नाशिकच्या सातपूर परिसरातील कार्बन नाका या ठिकाणी असलेल्या सुशीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, मात्र यावेळी मृतदेह तातडीने पॅकिंग करून ताब्यात देण्याऐवजी पॅकिंग करण्यासाठी तीन हजार रुपये अतिरिक्त मागण्यात आल्याचा आरोप जाधव यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

(हेही वाचा : महापालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये लवकरच ऑक्सिजन प्लांट! ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीचा परिणाम)

मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी नातेवाईकांना वाट पहावी लागते! 

याचबरोबर रुग्णालयांमध्ये डिपॉझिट घेतल्याशिवाय रुग्ण ऍडमिट करून घेतले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला असून याप्रकरणी रुग्णालयातील डॉक्‍टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. दरम्यान तब्बल तीन तास मृतदेह मिळावा म्हणून रुग्णालयाच्या आवारात जाधव यांच्या नातेवाईकांना बसवून ठेवण्यात आल्याने त्यांनी रोष व्यक्त केला आहे, तर हतबल झालेल्या या नातेवाईकांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या संकटकाळात नागरिकांची अशा प्रकारे लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी देखील मागणी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.