मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र मनसेच्या या भूमिकेनंतर पोलिसांनी आदेशाचा भोंगा वाजवला आहे. सध्या आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी चर्चेत आणि वादामध्ये अडकलेले नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी धार्मिक स्थळांवरच्या ध्वनीक्षेपकांबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, सर्वच धार्मिक स्थळांना भोंग्यांसह इतर ध्वनीक्षेपक यंत्रणांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.
मुसलमान बांधवांकडून आयुक्तांना पत्र
नाशिक हे राज्यातील पहिले शहर आहे जिथे हा आदेश काढण्यात आला. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर नाशिकमधील भद्रकाली मंदिरात लाऊड स्पीकर लावण्यात आले. त्यावर हनुमान चालिसा लावली जात आहे. त्यामुळे मुसलमान बांधवांकडून एक पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात आले. यात दिवसातील 5 वेळा अजान लावणे हे आमच्या धर्माचा भाग असल्याचे सागंण्यात आले आहे. तसेच, अजानच्या वेळी हनुमान चालिसा न लावण्याचीही विनंती त्यांनी या पत्रातून आयुक्तांना केली आहे.
( हेही वाचा: किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? सलग चार दिवस होणार चौकशी )
…तर कारवाई होणार
तसेच, मनसेनेही पत्र दिले की नाशिकमध्ये जशी हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात आली. त्याच पद्धतीने मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढावे अशा स्वरुपाचे पत्र देण्यात आले होते. या सर्व बाबींचा आयुक्तांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, नाशिक आयुक्तालयाच्या परिसरात जेवढे मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे आणि चर्च येतात त्या सर्वच ठिकाणी भोंगे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. अजान चालू असताना, 100 मीटरच्या परिसरात हनुमान चालिसाचे पठण करण्यास नाशिक पोलीस आयुक्तांनी मनाई केली आहे. जो या नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community