बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस बंद राहणार आहेत. अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत मंदिर बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामांमुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नेहमीप्रमाणे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
मंदिराच्या संवर्धनाचे काम होणार असून, ते भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे, असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे याता सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
( हेही वाचा: ट्रेनला उशीर झाला तर तिकीटाचे सर्व पैसे होणार रिफंड; रेल्वेमंत्र्यांची घोषणा )
शिवलिंगाची झीज होत असल्याने मंदिर प्रशासनाकडून चिंता व्यक्त
त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे. तसेच, शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघत असल्याचे, दिसून येत असून हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीदेखील शिवलिंगाची झीज होत असल्याने मंदिर प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराची देखभाल दुरुस्तीसाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community