भुसावळचे तापमान सर्वाधिक 46.9 वर नोंदवले गेले आहे. त्यातच महावितरणकडून भारनियमनामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. नाशिकमध्ये २२ तास वीज गेली होती. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकलहरे सबस्टेशनला टाळे ठोकले. छत्रपती संभाजीनगरमध्येही वीजेचा लपंडाव सुरू आहे. जळगावमध्ये तर तात्पुरते भारनियमन सुरू करण्यात आले आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. आणखी दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अशीच तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. त्यात वीज गेल्यामुळे झाल्यामुळे लहान मुले, वृद्धांची अवस्था तर दयनीय झाली आहे.
मात्र, राज्यात कुठेही भारनियमन सुरू नाही. अनेक भागांत अचानक वीजेची मागणी वाढली. त्यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे, अशी प्रतिक्रिया महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.
(हेही वाचा – वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी Central Railway चा टास्क फोर्स)
नाशिकमध्ये २२ तास भारनियमन
नाशिकमधील इंदिरानगरपासून डीजीपीनगरपर्यंत तसेच दीपालीनगर, खोडेनगर, विनयनगर, अशोकारोड या भागातवारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना बुधवारी (दि. २२) सकाळी ८ ते गुरुवारी, (दि. २३) सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजखंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. एकही अधिकारी, कर्मचारी फन उचलेना. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भरच पडत होती. त्यामुळे या भागातील रहिवासी, व्यावसायिक, राजकीय, सामाजिक संस्था प्रतिनिधींनी महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना घेराव घालत जाब विचारला. तत्काळ उपाय योजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. इंदिरानगर, वडाळारोड या परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक समस्या निवारण समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून शुक्रवारी नाशिकरोड येथील विद्युत भवनमध्ये मुख्य अभियंत्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
बेमुदत आंदोलनाचा इशारा
वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रहिवासी, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा नागरिक समस्या निवारण समितीचे संदीप जगताप, रमीज पठाण, प्रवीण जाधव, संतोष गाडेकर, यांच्यासह राजकीय आणि सामाजिक संस्थांतील प्रतिनिधींनी महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community