National Film Awards : ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर 

180
‘एकदा काय झालं’ या चित्रपटला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला. यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार ‘रेखा’या मराठी चित्रपटाला तर सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी ‘थ्री टू वन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला जाहीर झाला. आज 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2021 साठीच्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अतिरीक्त सचिव निरजा शेखर, चित्रपट लेखन परीक्षक समितीचे अध्यक्ष यतींद्र मिश्रा, नॉन फिचर फिल्म परीक्षक समितीचे अध्यक्ष वसंथ साई, चित्रपट परीक्षक समितीचे अध्यक्ष केतन मेहता यांनी विविध श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची  घोषणा केली. फिचर फिल्ममध्ये विविध 32  श्रेणीत पुरस्कार जाहीर झालेले आहेत, यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध 24 श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर झाले.

‘एकदा काय झालं’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

वर्ष 2021 मध्ये मराठी भाषेमधून ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वडील आणि मुलाच्या नात्यातील नितांत सुंदर आणि हळवा प्रवास चित्रपटातून दाखविण्यात आलेला आहे. या चित्रपटाला रजत कमल पुरस्कार जाहीर झाला असून  निर्माता गजवंदना शो बॉक्स एलएलपी तर दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे आहेत.
‘गोदावरी (द होली वॉटर)’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन न‍िख‍िल महाजन यांनी केले. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ,  2 लाख 50 हजार रोख असे आहे. नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘थ्री टू वन’  या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत असणाऱ्या चित्रपटला  जाहीर झालेला आहे.  हा पुरस्कार संयुक्तरीत्या ‘मिठू’  सोबत मिळालेला आहे. ‘थ्री टू वन’  या सिनेमाची निर्मिती एफटीआयआयची असून दिग्दर्शक हिमांशू प्रजापती आहेत. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि प्रत्येकी 50,000 हजार रूपये रोख आहे.
‘रेखा’ या मराठी नॉन फिचर फिल्मला विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर बापु रणखांबे यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे. हिंदीमधील सर्वोत्कृष्ट स‍िनेमा ‘सरदार उधम’ हा ठरला.  2021 यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दक्ष‍िण स‍िनेमे अधिक दिसून आले असून उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार ‘पुष्पा’  या तेलगु चित्रपटासाठी अल्लु अर्जून ला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 2 अभिनेत्रींना विभागून मिळणार आहे. ‘गंगुबाई काठ‍ियावाडी’ या चित्रपटासाठी आल‍िया भट तर ‘मिमी’ या चित्रपटासाठी क्रिती सेनॉन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार ‘मिमी’ या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी तर उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना ‘द कश्मीर  फाइल्स’ या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ अंतराळ वैज्ञानिकावर आधारीत असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तर संपूर्ण मनोरंजन या श्रेणीतील  पुरस्कार ‘आर आर आर’ या तेलुग सिनेमाला जाहीर झालेला आहे. नर्गीस दत्त राष्ट्रीय एकात्मता या श्रेणीतील पुरस्कार ‘द कश्म‍ीर फाइल्स’ या हिंदी सिनेमाला जाहीर झालेला आहे. सिने सृष्टीतील एकूण उत्कृष्ट कारकीर्दीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके’ राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा नंतर करणार असल्याचे आजच्या पत्रकार परीषदेत सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.