National Girl Child Day : मुलीच्या भविष्याची चिंता आहे? ‘या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा सर्वाधिक फायदा

पालकांना आपल्या मुलीच्या चांगल्या शिक्षणासह त्यांच्या लग्नाचीही चिंता असते. यासाठी पालक अनेक नव्या नव्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. दरवर्षी आपल्या देशात २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केली जातो. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य सुधारू शकतात आणि तणामुक्त होऊ शकतात. मुलींसाठीच्या सरकारी योजनांची माहिती यावेळी घेऊया…

( हेही वाचा : कांदा- टोमॅटो नाही ‘या’ भागातील लोक खातात मुंग्यांची चटणी! GI टॅगसाठी मागणी)

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ या अभियानाचा भाग आहे. या योजनेअंतर्गत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी हे खाते उघडता येणार आहे. यासाठी पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते. सरकार सध्या या योजनेवर ७.६ टक्के रिटर्न देत आहे. यामध्ये तुम्ही किमान २५० रुपये वार्षिक जमा करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. सुरूवातीच्या १४ वर्षांसाठी खात्यात तुम्हाला रक्कम जमा करावी लागेल. २१ वर्षांनंतर ही योजना परिपक्व होते. मात्र १८ वर्षांच्या वयानंतर मुलीचे रक्कम झाल्यास ही रक्कम तुम्ही काढू शकता. याशिवाय १८ व्या वर्षांनंतर तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढू शकता. नवीन नियमानुसार एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींचे खाते उघडण्याची तरतूद करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री

राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्दिष्टांसाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१६ रोजी लागू केला होती. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष, दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे बंधनकारक आहे. कुटुंब नियोजनाच्या नियमांचे पालन केल्यावर सरकारकडून एका मुलीच्या नावे ५० हजार रुपये किंवा दोन मुली असल्यास २५ हजार प्रत्येकी असे पैसे बॅंकेत जमा होणार आहेत. आई व मुलीच्या नावे जॉईन अकाउंट यामध्ये ५ हजारांपर्यंत ओव्हरड्राफ्ट आणि १ लाख रुपये अपघात विमा या सुविधा मिळतील.

बालिका समृद्धी योजना

बालिका समृद्धी योजना ही योजना सुद्धा सुकन्या समृद्धी योजनेसारखीच आहे. मुलीच्या जन्मानंतर ५०० रुपये अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेत खाते उघडता येते. सरकारकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्याज दिले जाते. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ही रक्कम काढता येते.

सीबीएसई उडान योजना

सीबीएसई उडान योजना ही मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. ही योजना मुलींसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देते. मुलींना अभ्याससामग्रीसह टॅबलेटसुद्धा दिले जातात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here