चकमक फेम माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याच्या अंधेरीतील पीएस फाउंडेशनच्या कार्यालयावर एनआयएच्या पथकाने बुधवारी छापे टाकून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. पीएस फाउंडेशनवर कार्यालयावर दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली असून या छापेमारीमुळे शर्मा याच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
यापूर्वीही एनआयएने या संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकलेला!
अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजी पॊलिस अधिकारी प्रदीप शर्माने अनेक वर्षांपूर्वी पी.एस फाऊंडेशन ही गैरसरकारी संस्था सुरु केली आहे. या संस्थेकडून अनेक सामाजिक कार्य राबवण्यात आले असून अनेक गरजूंना या संस्थेमार्फत मदत देखील करण्यात आलेली आहे. मात्र ही संस्था आता एनआयएच्या रडारवर आली आहे. बुधवारी एनआयएच्या पथकाने पीएस फाऊंडेशनच्या अंधेरी येथील कार्यालयावर छापा टाकला. एका तासाच्या शोध मोहिमेनंतर एनआयएने काही कागदपत्रे ताब्यात घेऊन निघून गेले. यापूर्वी देखील एनआयएने या संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकून काही कागद्पत्रे ताब्यात घेतली होती. ही छापेमारी दुसऱ्यांदा करण्यात आली आहे.
(हेही वाचा : दाऊदचा भाऊ एनसीबीच्या कोठडीत! ड्रग्सचे अंडरवर्ल्ड कनेक्शन बाहेर येणार?)
अंटालिया स्फोटक प्रकरणात पीएस फाऊंडेशनचा सहभाग!
अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पीएस फाऊंडेशन या संस्थेचा वापर करण्यात आला आहे का? या संस्थेच्या मार्फत या प्रकरणात काही आर्थिक सहभाग आहे का? याचा शोध घेण्यासाठी ही छापेमारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएस फाऊंडेशनच्या छापेमारीमुळे प्रदीप शर्माच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
Join Our WhatsApp Community