नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामुळे प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात असे अपघात होऊ नयेत, यासाठीच्या उपाययोजना करण्याकरिता सर्व विभागांच्या प्रमुखांची विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे यावेळी निश्चित केले.
( हेही वाचा : धक्कादायक! पुण्यातील नवले पुलावर ३ दिवसात दुसरा अपघात)
या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास बोनाला, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.
अपघात रोखण्यासाठी खालील उपाययोजना आवश्यक
- मुख्य उतार कमी करण्याबाबत उपाययोजना
- स्वामी नारायण मंदिर ते दरी पुलामधील तीव्र वळण कमी करणे.
- रम्बलर स्ट्रिप्स व रिफ्लेक्टर विविध ठिकाणी बसविणे.
- जड वाहनांची वेगमर्यादा टप्प्याटप्प्याने ताशी ४० किमीपर्यंत कमी करणे
- सर्व्हिस रस्ता रुंद करणे, दुरूस्ती करणे, तेथील अतिक्रमणे काढणे.
- नवा बोगदा ते नवले पुलापर्यंत विविध ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासंदर्भात ऑडिओ सिस्टिम बसविणे.
- स्ट्रीट लाईटची संख्या वाढवणे.
- पुल सुरू होताना आणि पुलावर विविध टिकाणी ब्लिंकर बसविणे.