प्रदूषण हि जागतिक समस्या आहे. नुकतेच राष्ट्रीय हवामान सेवा (National Weather Service) या संस्थेने केलेल्या निरीक्षणात उरण हे देशातील हवेतील धूलिकणांच्या कक्षेत पहिल्या क्रमांकावर आल्याने येथील वायू प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या संस्थेने केलेल्या निरीक्षणात उरणचा हवेचा निर्देशांक (एक्यूआय) १०३ वरून थेट १९६ पर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. त्या वेळी उरणचे प्रदूषण पातळीतील स्थान देशात पहिले होते. ( Navi Mumbai Air Pollution )
मार्च २०२२ मध्ये धूलिकणांमुळे प्रदूषित ठरलेले उरण हे तेव्हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले होते. बुधवारी पुन्हा एकदा हे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले. उत्तर प्रदेशातील बेगुसराय आणि तामिळनाडू येथील थुटूकोडी ही शहरे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होती. १० फेब्रुवारी २०२२ रोजी उरण येथील प्रदूषणाची नोंद ही जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर आणि देशात चौथ्या स्थानावर झाली होती. याबाबत त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण व नगरविकास विभागांना पाहणीच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी हे प्रमाण कमी होऊन ही नोंद १५४ पर्यंत खाली आली असली तरीही ही आकडेवारी फारशी समाधानकारक नाही. ( Navi Mumbai Air Pollution )
प्रदूषण नियंत्रण मंडळाची निष्क्रियता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात सुरू असलेल्या स्फोटांमुळे उलवे तसेच आसपासचा परिसरही काळवंडला आहे. जवाहरलाल नेहरू बंदरातून दररोज शेकडोंच्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. यामुळेही हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण पर्यावरणप्रेमी संस्थांनी यापूर्वीही नोंदविले आहे. परिणामी उरण परिसरातील मोठ्या प्रकल्पांच्या कामांमुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. पनवेल व नवी मुंबई हे लगतच असल्याने येथील हवा प्रदूषणाची मात्रा ही १५४ च्या आसपास म्हणजे नागरिकांस अपायकारक असून विकासकामे, इमारत बांधकामे व माल वाहतूक यामुळे निर्माण होणाऱ्या धूलिकणांच्या परिणामी प्रदूषणात वाढ होत आहे.
हवेची गुणवत्ता पात्रता
हवेतील प्रदूषणाची मात्रा ही ० ते ५० चांगली, ५० ते १०० मध्यम, १०० ते १५० आजारी व श्वसनविकारासाठी हानिकारक, तर १५० ते २०० ची मात्रा ही प्रचंड हानिकारक मानली जाते.
उपाययोजना करण्याची मागणी
विकास हवा मात्र प्रदूषणाचा फास नको असे आवाहन उरणमधील नागरिकांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केले आहे. प्रदूषणाचा सर्वाधिक फटका हा ज्येष्ठ रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे शासनाने यावर लक्ष देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व येथील प्रकल्पाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करणार आहे.