उच्च न्यायालय (Bombay High Court) यांनी जनहित याचिका क्रमांक 155/2011 प्रकरणी पारित केलेल्या 31 जानेवारी 2017 व 19 डिसेंबरच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर (Unauthorized Hoardings) यांच्यावर करण्यात आलेल्या व करण्यात येत असलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नवि-2 के.एच.गोविंदराज यांनी सर्व संबधित प्राधिकरणांची बैठक घेऊन मौलिक सूचना केल्या. (Navi Mumbai Municipal Corporation)
(हेही वाचा – GDP Growth : चालू आर्थिक वर्षांत विकास दर ६.५ टक्क्यांवर राहण्याचा अर्थ मंत्रालयाचा अंदाज)
त्यास अनुसरुन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेत प्रधान सचिव महोदयांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (2) डॉ.राहुल गेठे आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर लावण्यासाठी महानगरपालिकेने जागा निश्चित केल्या असून त्याच जागांवर, विहित आकारमानात जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर प्रदर्शित केले जातील याची खात्री संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी करुन घ्यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
या फलकांवर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगीचे ठिकाण, परवानगीचा कालावधी हा फलकाच्या आकारासह व क्यू आर कोडसह नमूद असावा असे आयुक्तांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त आपल्या विभागीय क्षेत्रात कुठेही विनापरवानगी बॅनर लावले जाणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. विनापरवानगी फलक प्रदर्शित केलेला दिसल्यास त्यावर दंडात्मक व शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी असेही आयुक्तांनी स्पष्टपणे निर्देशित केले.
याबाबतच्या सूचना जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर छपाई करणा-या प्रिंटींग प्रेस यांनाही देण्यात याव्यात तसेच सर्व राजकीय पक्षांनी याबाबतचे हमीपत्र दाखल केलेले असल्याने नवी मुंबईतील सर्व राजकीय पक्ष प्रमुखांना याबाबत माहिती द्यावी असेही आयुक्तांनी सूचीत केले.
या अनुषंगाने विभागनिहाय स्थापित समितीची बैठक घेण्यात यावी तसेच या विषयी नागरिकांना सुलभपणे तक्रार करता यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmconline.com या संकेतस्थळावर तक्रार निवारण प्रणाली (Public Grievance System) कार्यरत असल्याचीही प्रसिध्दी करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
तरी ज्या नागरिक / संस्थांना जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर लावावयाचे असतील त्यांनी संबधित विभाग कार्यालयाची रितसर परवानगी घेऊन परवानगीत नमूद जागी व आकारात लावावेत, असे आवाहन करतानाच याबाबत विनापरवानगी जाहिरात फलक, होर्डिंग, बॅनर लावलेले आढळल्यास त्यावर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 चे कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचीही नोंद घ्यावी, असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation) वतीने सूचित करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community