राणा दाम्पत्याला जामीन पण सुटका नाहीच!

राजद्रोह आरोपाखाली अटक करण्यात आलेले राणा दाम्पत्य यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र कारागृहातील कागदोपत्री प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे या दाम्पत्याची सुटका बुधवारी, ४ मे रोजी होणार नाही.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघे मुंबईत वर्षा बंगल्यासमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी आले. त्यामुळे मुंबईत संघर्ष निर्माण झाला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी राणा दाम्पत्याना अटक केली. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र असे असले तरी जामिनाची प्रक्रिया बोरिवली न्यायालयात पूर्ण होण्यास विलंब होत आहे. यामुळे राणा दाम्पत्याला बुधवारची रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे.

(हेही वाचा मनसे आंदोलनाचा इफेक्ट : ठाण्यात मशिदींवरील भोंगे उतरवले)

का रहावे लागणार कारागृहात? 

राणा दाम्पत्याला जरी जामीन मंजूर झाला असला, तरी कारागृहाच्या लेटर बॉक्समध्ये ५.३०च्या आधी रिलीझ ऑर्डर पडणे आवश्यक असते. या प्रक्रियेला संपूर्ण विलंब होत आहे. तत्पूर्वी राणा दाम्पत्याला ज्या दिवशी अटक करण्यात आली, तो दिवस शनिवार होता आणि दुसऱ्या दिवशी रविवार. यासाठी त्यांची न्यायालयीन कोठडी मिळवण्यासाठी त्यांना सुट्टी कालीन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुट्टी कालीन न्यायालय हे वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात बसले होते, त्यामुळे त्या प्रभागातली सर्व प्रकरणे येथे वर्ग करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण मुळात बोरिवली न्यायालयात जाणे अपेक्षित होत. त्यामुळे रविवारची रिमांड झाल्यानंतर सर्व कागदपत्रे कायद्यानुसार बोरिवली न्यायालयाकडे सोपवण्यात आली. हे पाहता तांत्रिकदृष्ट्या बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाकडून कोठडीत होते. त्यामुळे त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असूनही त्यांना ज्या न्यायालयाने कोठडी सुनावली आहे, त्यासमोर जाणे आवश्यक आहे. त्यानुसार दंडाधिकारी न्यायालय मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार ऑर्डर काढतात. मग ही ऑर्डर घेऊन ती कारागृहात जमा करावी लागते. यानंतर आरोपीला तुरुंगातून सोडण्यात येत. मात्र या सर्व प्रक्रियेला विलंब होत असल्याने त्यांना आजची रात्र तुरुंगात काढावी लागू शकते.

खासदार नवनीत राणा जेजे रुग्णालयात दाखल

बुधवारी खासदार नवनीत राणा यांना भायखळा येथील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानदुखीच्या त्रासाने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. राणांच्या वकिलांनी कारागृह अधिक्षकांना पत्र लिहून त्यांच्या उपचारासाठी तातडीने परवानगी मागितली होती. खासदार नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी तुरुंग प्रशासनाने रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी, दुपारी १.२० वाजताच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. उपचारासाठी त्यांना ऑर्थोपेडिक विभाग सुचवण्यात आला आहे. संबंधित चाचण्या तपासण्या सुरु असल्याचे जेजे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here