ऑक्सिजन पाईपचा असाही होतोय वापर!

एनसीबीने मीरा-भायंदर येथील एका कुरियर कंपनीच्या कार्यालयातून कतारला जाणारे पार्सल ताब्यात घेतले, ज्यामधून अमली पदार्थांची तस्करी होणार होती.

अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी तस्कर काय शक्कल लढवतील याचा नेम नाही. एका ड्रग्स माफियाने कतारला अमली पदार्थ पाठवण्यासाठी चक्क माशांच्या टँकमधील ऑक्सिजन पाईपचा वापर केल्याचा प्रकार एनसीबीच्या कारवाईत समोर आला आहे. एनसीबीने मीरा-भायंदर येथील एका कुरियर कंपनीच्या कार्यालयातून कतारला जाणारे हे पार्सल ताब्यात घेतले असून या प्रकरणी नालासोपारा येथून एकाला अटक करण्यात आली आहे.

नालासोपारामधून दोघांना अटक!

साबिर सौकत अली असे अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्याचे नाव आहे. साबीर हा सराईत ड्रग्स तस्कर असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने बुधवारी केलेल्या दोन कारवाईत मुंबई आणि नालासोपारा येथून एका कॅमेरून नागरिकासह साबीर शोकत अली याला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या कॅमेरून नागरिकाकडून मफेड्रोन, नशेच्या गोळ्या आणि रोख रक्कम जप्त केली होती. कॅमेरून नागरिक हा नॉर्थ आफ्रिका येथे बायोलॉजीचा शिक्षक असून मुंबईत तो ड्रग्स विक्रीचा धंदा करतो, अशी माहिती एनसीबीने दिली.

एनसीबीने केली कारवाई!

दरम्यान अटक करण्यात आलेल्या साबीरच्या चौकशीत त्याने कतार येथे पाठवण्यासाठी भायंदर येथील एका कुरियर कंपनीकडे एक पार्सल पाठवले असून त्या पार्सलमध्ये गांजा हा अमली पदार्थ असल्याची माहिती त्याने एनसीबीला दिली. एनसीबीने भायंदर येथून कुरियर कंपनीकडून ताब्यात घेण्यात आलेले पार्सल उघडले असता त्यात माशाच्या टँकमध्ये वापरले जाणाऱ्या ऑक्सिजन पाईपमध्ये गांजा भरून ते पार्सल कतार येथे अब्दुल हॅमडे या नावाने पाठवण्यात येणार होते. साबीर हा अमली पदार्थ तस्कर असून त्याची कतार येथील अमली पदार्थ माफियाशी संबंध असून मागील काही वर्षांपासून तो या व्यवसायात असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. साबीरला ड्रग्स तस्करी प्रकरणी यापूर्वी दिल्ली एनसीबीने अटक केली होती, जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने तस्करीचा धंदा सुरू केला होता, अशी माहिती एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here