असा पकडला गेला सिद्धार्थ पिठाणी!

एनसीबीचे संचालक वानखेडे हे सिद्धार्थला सोशल मीडियावर फॉलो करत होते, वानखेडे यांना सोशल मीडियावरूनच त्याचा ठावठिकाणा लागला.

सीबीआयच्या चौकशीनंतर अचानक गायब झालेला सुशांतसिंग राजपूतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणी याला एनसीबीकडून चौकशीसाठी तीन वेळा समन्स पाठवण्यात आले होते. मात्र त्याने समन्सला उत्तर दिलेच नसल्यामुळे एनसीबीने त्याचा शोध सुरू केला होता. सीबीआयने पिठाणीचा मोबाईल ताब्यात ठेवल्यामुळे त्याचा नवीन मोबाईल क्रमांक देखील एनसीबीकडे नसल्यामुळे पिठाणीचा काहीही मागमूस लागत नव्हता.

सिद्धार्थ पिठाणी देखील संशयित आरोपी होता!

सिद्धार्थ पिठाणी हा सुशांतसिंग राजपुतला ड्रग्स पुरवत होता व तो ड्रग फाल्को नावाच्या ड्रग्स डीलरकडून घेत होता. फाल्कोला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत एनसीबीला ही माहिती उघड झाली होती, त्यामुळे सिद्धार्थ पिठाणी देखील एनसीबीकडे दाखल असलेल्या ड्रग्सच्या गुन्ह्यात संशयित आरोपी होता. सिद्धार्थ याचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन वेगळ्या नावाने सिद्धार्थ पिठाणीचा मागमूस काढायला सुरुवात केली होती.

(हेही वाचा : सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर एनसीबीचे धाडसत्र!)

सोशल मीडियावरून ठावठिकाणा शोधला!

दरम्यान सिद्धार्थ पिठाणी याने अटकेच्या काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याच्या एंगेजमेंट (साखरपुडा) एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर त्याने एका जिममधील सेल्फी पोस्ट केला आणि त्याच्यावर लोकेशन टाकले. सिद्धार्थला सोशल मीडियावर फॉलो करणारे वानखेडे यांच्या लक्षात येताच त्यांनी लोकेशन वरून जिम शोधली असता ही जिम हैद्राबाद येथील असल्याचे समोर आले. एनसीबीचे संचालक वानखेडे आणि त्याच्या टीमने या जिमची अधिक माहिती मिळवून सिद्धार्थ याचा पत्ता शोधून काढला. सिद्धार्थ हा हैद्राबादमध्ये असल्याचे कळताच वानखेडे यांनी हैद्राबाद येथील एनसीबीची मदत घेतली आणि मुंबईतून एक टीम हैद्राबाद येथे रवाना केली. सीबीआयच्या चौकशीनंतर सुशांतसिंग प्रकरण शांत झाल्याच्या भ्रमात असलेल्या सिद्धार्थला एनसीबी आपल्यापर्यंत पोहचेल याची कल्पना देखील नव्हती. अखेर मुंबईतून हैद्राबाद येथे गेलेले एनसीबीचे पथक आणि हैद्राबाद येथील पथकाने सिद्धार्थ पिठाणी याच्या मुसक्या आवळल्या. अटकेच्या १५ दिवसांपूर्वीच सिद्धार्थ पिठाणी याचा साखरपुडा झाला होता. एनसीबीने तीन वेळा समन्स पाठवून देखील तो आपल्याला अटक होणार नसल्याच्या भ्रमात होता सिद्धार्थ पिठाणी मात्र त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि एनसीबीने त्याला ड्रग्सच्या गुन्हयात अटक केली. सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता एनसीबीने वर्तवली आहे. दरम्यान एनसीबीने मंगळवारी वांद्रे परिसरात छापमारी करून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे या प्रकरणात कसून चौकशी सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here