साहित्य आणि राजकारण यांचा अतूट संबंध आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण हे उत्तम साहित्यिक होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्यव्यवस्था स्थापन झाली. त्यानंतर अभिव्यक्ती, प्रसारमाध्यमे अथवा साहित्य हा लोकशाहीचा चौथा स्तंभ गणला गेला. राज्यकर्त्यांकडून त्याला राजाश्रय मिळाला, असे उदगार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काढले.
उदगीर येथील ९५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी भाषणात शरद पवारांनी राजकारणी आणि साहित्यिक यांचे नाते कसे असावे, हे सांगताना साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये, असे आवाहन केले. राज्यकर्ते कोणतेही उपकार करत नाहीत, ते त्यांचे कर्तव्य असल्याचे सांगत देशात विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावतोय, तेव्हा साहित्यिक आणि रसिकांनी डोळ्यांत तेल घालून दक्ष रहा, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा मुंबईत राणा दाम्पत्य आक्रमक, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे अस्तित्व धोक्यात)
दुर्गा भागवतांच्या भाषणाचा उल्लेख
अगदी विधिमंडळाचे सदस्य करणे, पद्म पुरस्कारासाठी निवड करणे येथपर्यंत साहित्यिकांना प्रोत्साहन दिले जाते. आश्रयदात्यांनी ह्या प्रोत्साहन आणि मदतीचा उपयोग आपल्या कौतुकासाठी अथवा स्वार्थासाठी करु नये. लेखन सार्वभौम आणि स्वतंत्र हवे. दुर्गा भागवत म्हणतात की, ‘लेखन मेले तर विचार मेला आणि विचार मेला की संस्कृतीचा क्षय होऊन विकृती जन्माला येते. जगाच्या इतिहासाकडे पाहिले तर एक लक्षात येते की, राजे-राज्यकर्त्ये जातात पण ग्रंथ चीरकाल राहतात. लेखणीतून क्रांती घडली आहे. त्यामुळे साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. साहित्यिकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वयाचे आणि स्नेहभावाचे नाते असावे’, असेही पवार म्हणाले.