बलात्कारानंतर हत्या : देशभरातील १० टक्के घटना घडल्या महाराष्ट्रात!

बलात्कार, हत्येपाठोपाठ महिलांना विविध कारणांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.

साकीनाका येथे पाशवी बलात्कार आणि त्यानंतर निर्घृण हत्येची घटना घडली आहे. त्यामुळे आता महिला सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच या निमित्ताने महिला अत्याचाराची आकडेवारीही समोर आली आहे. महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या घटना मागील वर्षभरात देशभरात एकूण २२३ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील १० टक्के अर्थात  २३ घटना एकट्या महाराष्ट्रात घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

काय म्हटले आहे अहवालात?

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) बुधवारी यासंबंधीची आकडेवारी असलेला अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये  गेल्यावर्षी अशाप्रकारचे सर्वाधिक ३१ गुन्हे उत्तर प्रदेशात नोंद झाले आहेत, त्या खालोखाल मध्यप्रदेशांत २७, आसाम २६ आणि महाराष्ट्राचा २३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच यामध्ये मुंबईतील दोन जणींचा समावेश आहे. २०१९च्या तुलनेत हा आकडा ६० ने कमी आहे. या अहवालानुसार गेल्या वर्षी सर्वाधिक महिलांविरोधी ४९ हजार ३८५ इतके गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले. त्याखालोखाल पश्चिम बंगाल ३६,४३९, राजस्थान ३४,५३५, तर महाराष्ट्रात ३१ हजार ९५४ गुन्हे नोंद केले गेले.

(हेही वाचा : ओबीसी आरक्षणाचा आध्यादेशही अडचणीत! कारण काय?)

आत्महत्येस प्रवृत्त करण्यात महाराष्ट्र आघाडीवर!

बलात्कार, हत्येपाठोपाठ महिलांना विविध कारणांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात ८४४, मध्यप्रदेश ७४४ आणि पश्चिम बंगालमध्ये ४९० महिलांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्यात आले. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८०८ महिला-तरुणींनी दबावाला बळी पडून आत्महत्या केल्या होत्या. लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार नोंद गुन्ह्यांमध्येही महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांचेही राज्यात प्रमाण अधिक आहे. महिला अत्याचारात पहिल्या वीस शहरांमध्ये राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here