अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम टेक्सासमधील एका डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच फार्ममधील एका कर्मचाऱ्याला देखील किरकोळ जखम झाली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या विस्फोटामागील अचूक कारण अजून समजू शकलेले नाही. अमेरिकेमध्ये २०१३ मध्येही अशीच एक मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर आत्ताचा हा अपघात सर्वांत मोठा असल्याचे म्हटले जात आहे.
टेक्सासच्या डिमिटमधील साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्ये झालेला हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास तासभर तेथील परिसरात धुरामुळे काळाकुट्ट अंधार पसरला होता. या आगीमुळे डेअरी फार्म मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तशीच मोठ्या प्रमाणात पशुहानी देखील झाली आहे. मात्र या सर्व संदर्भात डेअरी फार्म मालकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दूध काढण्यासाठी या गायींना एका गोशाळेत बांधण्यात आले होते. नेमका त्याचवेळी हा स्फोट झाला. या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या गायींचे मुल्य भारतीय चलनानुसार प्रत्येकी १ लाख ६३ हजार रुपये इतके होते. टेक्सास डेअरीच्या २०२१च्या वार्षिक अहवालानुसार या फार्ममध्ये जवळपास ३० हजार गायी आहेत. डेअरी फार्ममधील एका यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात असून या मागील मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरू आहे.
(हेही वाचा – उष्णतेच्या लाटेचा इशारा! पारा ४० अंशावर, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक तापमान)
Join Our WhatsApp Community