- प्रतिनिधी
ओडिशा साहित्य अकादमीचा ‘नीलिमा रानी साहित्य पुरस्कार 2025’ (Neelima Rani Literary Award 2025) माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना जाहीर झाला आहे. दहा लाख रूपये, चांदीचे चिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अकादमीच्या प्रमुख डॉ. इतिरानी सामंता यांनी शुक्रवारी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे ‘नीलिमा रानी साहित्य पुरस्कार 2025’ साठी पासपोर्ट मॅन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा केली. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष होय. यापूर्वी, पद्मश्री प्रो. मनोज दास, अनुराधा रॉय, नमिता गोखले आणि मृदुला गर्ग यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.
डॉ. इतिरानी सामंता यांच्यानुसार, या पुरस्कारासाठी शंभर लेखकांच्या नावांवर विचार केला गेला. सर्वंकष विचाराअंती पाच ज्युरींनी डॉ. मुळे यांची निवड केली. अकादमीतर्फे दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी ओडिशात साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. 5 जानेवारी 2025 रोजी भुवनेश्वरमध्ये संमेलन आयोजित करण्यात असून येथेच डॉ. मुळे यांना पुरस्कृत केले जाणार आहे. कादंबिनी ही देशातील एकमेव खासगी साहित्य अकादमी असल्याचे सामंता यांनी सांगितले. (Neelima Rani Literary Award 2025)
(हेही वाचा – Border-Gavaskar Test, Melbourne Test : बोर्डर-गावस्कर मालिका बरोबरीत सुटली तर, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं काय होईल?)
एका अभिजात भाषेकडून दुसऱ्या अभिजात भाषेचा सन्मान
नीलिमा रानी साहित्य अकादमी पुरस्कार (Neelima Rani Literary Award 2025) म्हणजे एका अभिजात भाषेने दुसऱ्या अभिजात भाषेचा केलेला सन्मान होय. या सन्मानाने मी अभिभूत झालो आहे, अशी भावना डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली. भारतीयांना लेखक म्हणून शेक्सपिअर आठवतो. मात्र, शेजारच्या राज्यांतील चार-पाच साहित्यिकांची नावे विचारली तर ती सांगता येणार नाही, ही खरी शोकांतिका आहे. मात्र, उडिया भाषेने जसा मराठी भाषेचा सन्मान केला तसाच अन्य राज्यांतील भाषांनी दुसऱ्या राज्यांतील भाषांचा सन्मान करण्याची परंपरा सुरू करायला पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. मुळे यांनी व्यक्त केली.
डॉ. मुळे यांनी ओडिशाचे प्रख्यात लेखक रमाकांत रथ यांच्या ‘श्री राधे’ कादंबरीचे मराठीत भाषांतर केले आहे. तर मुळे यांच्या मन के खलिहानामे, माती पंख आणि आकाश, शांती की अफवाहें, ऋतू उग रही हैं आणि मै जहॉ जहॉं चला हूं, या पाच पुस्तकांचे उडिया भाषेत भाषांतर झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community