आगामी ५ मार्च २०२३ रोजी होणारी नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायाधीश एस. रवींद्र भट आणि न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार देत या सर्व याचिका फेटाळून लावल्या. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सध्या सुरू असलेल्या इंटर्नशिपमुळे परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती याचिकेच्या माध्यमातून केली होती.
याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, केंद्र सरकारच्या वकील ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की, नीट-पीजी २०२३ची तारीख ६ महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या विंडो दरम्यान, २.०३ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि आज नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र जारी केली गेली आहे. पुढे त्यांनी म्हटले की, दुसऱ्या विंडोदरम्यान केवळ ६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी अर्ज केले आहेत आणि त्यामुळे फार कमी विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे.
ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन म्हणाले की, इंटर्नशिपची पूर्ण करण्याची अंतिम मुदत आणि परीक्षा यांच्यातील अंतर कधीही २ महिन्यांपेक्षा जास्त नसते. अशा प्रकारे परीक्षेला घाई करून काही फायदा आहे का? असा सवाल त्यांनी याचिकाकर्त्यांच्यावतीने कोर्टात केला. दरम्यान, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसने (एनबीईएमएस)ने नीट-पीजी २०२३ इंटर्नशिप कट ऑफ डेट ३० जून २०२३ पर्यंत वाढवली आहे.
नीट-२०२२ समुपदेशन आणि प्रवेशांमध्ये कोरोना साथीरोगामुळे झालेल्या विलंबाचा वैद्यकीय इच्छुकांच्या परीक्षेच्या तयारीवर मोठा परिणाम झाला असल्याची चिंता विद्यार्थी आणि वैद्यकीय संघटनांनी व्यक्त केली. सध्याच्या वेळापत्रकानुसार, मार्च २०२३ मध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांना नीट-पीजी २०२३ ची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असा दावा केला जात आहे.
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा)
नीट-पीजी २०२३ ही भारतातील एमडी/एमएस/पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी एकमेव पात्रता परीक्षा आहे. भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६च्या नियमांनुसार या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इतर कोणत्याही राज्य किंवा संस्थात्मक-स्तरीय प्रवेश परीक्षा वैध मानल्या जाणार नाहीत. नीट-पीजी दरवर्षी देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केली जाते आणि लाखो इच्छुक विद्यार्थी ही परीक्षा देतात.