राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख रविवारीही दिसून आला. मे महिन्याच्या सुरुवातीला आढळलेल्या नव्या रुग्णांच्या तुलनेत आता राज्यात ३० ते ५० टक्के नव्या रुग्णांची नोंद दिसून येत आहे. परिणामी रविवारी राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ३०४ वर पोहोचली आहे. मात्र हे प्रमाण अत्यल्प
मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील नव्या रुग्णांची यादी शंभरीपार होत असल्याचे, निदर्शनास आले होते. १ मे रोजी राज्यात १६९ नवे कोरोना रुग्ण दिसले होते. परंतु गेल्या चार दिवसांत सातत्याने दर दिवसांच्या नव्या नोंदीत दोनशेहून अधिक रुग्णांचा आकडा नोंदवला जात आहे. सलग चौथ्या दिवशी रविवारी राज्यात नव्या २२४ कोरोनाचे रुग्ण तपासणीअंती दिसून आले. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्क्यांवर कायम आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
गेल्या चार दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी
- ५ मे – २३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यातील कोरोना रुग्णांच्या नोंदीचा आकडा १ हजार १०९ वर नोंदवला गेला.
- ६ मे – २०५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार १६१ वर पोहोचली.
- ७ मे – राज्यातील कोरोनाच्या नव्या नोंदीत नवा उच्चांक गाठला गेला. राज्यात एकाच दिवशी २५३ कोरोनाचे रुग्ण आढळले. परिणामी, राज्यातील कोरोनाची आकडेवारी थेट १ हजार २७७ वर पोहोचली.
- ८ मे – २२४ कोरोनाच्या नव्या नोंदीसह राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता १ हजार ३०४ वर पोहोचला आहे.
मुंबई आघाडीवर
मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत एकूण ६२८ कोरोनाचे रुग्ण होते. ८ मे रोजी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मुंबईत एकूण ८१५ कोरोनाचे रुग्ण दिसून आले आहे.