सांताक्रुझ कोलेकल्याण गावात आता हिंदू आणि मुस्लिम समाजासाठी नव्याने स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. पीएनजी गॅसवर आधारित हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम समाजाकरता दफनभूमी तयार करण्यात येणार असून, दोन्ही समाजांसाठी स्मशानभूमीची उभारणी केली जात आहे.
मंजुरीच्या प्रतीक्षेत होती स्मशानभूमी
सांताक्रुझ पूर्व येथील कोलेकल्याण गावात हिंदू व मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीच्या बांधकामाचा निर्णय तब्बल दीड ते दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. परंतु महापालिका प्रशासनाने गंभीरतेने या प्रश्नाकडे लक्ष न दिल्याने, निविदा झाल्यानंतरही केवळ मंजुरीच्या प्रतीक्षेत ही स्मशानभूमी अडकून पडली होती. सप्टेंबर २०१९ रोजी या बांधकामाच्या निविदा होऊन, इमारत परिरक्षण व आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर पुढे कोणताही निर्णय घेतला नाही.
(हेही वाचाः मुंबईत उरले फक्त ४,७४४ कोविड रुग्ण)
साडेनऊ कोटी रुपये खर्च
परिणामी २३ मार्च २०२० पासून मुंबईत कोविड प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या स्मशानभूमीच्या बांधकामाचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला होता. परंतु आता पावणे दोन वर्षांनी अखेर प्रशासनाला या स्मशानभूमीच्या बांधकामाची आठवण आली आहे. त्यामुळे याचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. यासाठी साडेनऊ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी एपीआय सिविलकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे. हिंदू स्मशानभूमी पीएनजीवर आधारित असणार आहे.
सांताक्रुझ पश्चिममधील स्मशानभूमीची सुधारणा
सांताक्रुझ पश्चिम येथील माऊंट कार्मेल चर्चची खासगी स्मशानभूमीची सुधारणा करण्यात येणार असून, यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये आवारातील संरक्षक भिंतींची दुरुस्ती, विटांचे बांधकाम, लादीकरण, दफनभूमीच्या पदपथांचे दुरुस्तीकरण, प्रवेशद्वाराचे नुतनीकरण, तसेच एलईडी दिवे आदींची कामे केली जाणार आहेत.
(हेही वाचाः वाहतूक विभागाचा ‘हा’ खर्च मुंबई महापालिका उचलते)
Join Our WhatsApp Community